“Gen Z क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह; दोष देण्याऐवजी समजून घ्या”: विश्वास नांगरे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 17:11 IST2026-03-01T17:11:57+5:302026-03-01T17:11:57+5:30
Vishwas Nangare Patil: प्रशासनात पूर्वी इंग्रजीचे वर्चस्व होते; मात्र आता मराठीतील कामकाज वाढत आहे, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.

“Gen Z क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह; दोष देण्याऐवजी समजून घ्या”: विश्वास नांगरे पाटील
Vishwas Nangare Patil: नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जनरेशन Z’ ला दोष देण्यात अर्थ नसल्याचे स्पष्ट केले. आजची पिढी टेक्नोसॅव्ही, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आहे. समाजातील बदल आणि ‘दार बंद संस्कृती’मुळे काही प्रवृत्ती निर्माण झाल्या असल्या तरी मुलांचे गुण-दोष हे समाजाचेच प्रतिबिंब असतात, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनात पूर्वी इंग्रजीचे वर्चस्व होते; मात्र आता मराठीतील कामकाज वाढत आहे. तरीही काही मराठी शब्द न समजल्यास इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस दलाचा संदेश हा केवळ बंदुकीचा नसून संकेत, शिस्त आणि मूल्यांचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, परिसंवादात युवा पिढीची बौद्धिक आणि श्रमशक्ती ही भारताची ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रभाव दाखवण्यापेक्षा माणूस म्हणून घडणे अधिक महत्त्वाचे आहे, असा संदेश देत मराठी भाषा आणि संस्कृती जागतिक स्तरावर समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन या सत्रातून करण्यात आले.