“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:20 IST2025-10-09T14:17:12+5:302025-10-09T14:20:26+5:30
Congress Vijay Wadettiwar News: घायवळ पासपोर्ट मिळवतो, देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.

“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
Congress Vijay Wadettiwar News: कोथरुड गोळीबाराप्रकरणी मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला. त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता विरोधकांकडून योगेश कदम आणि महायुती सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.
माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुणे येथील गुंड घायवळ याच्या भावाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने शस्त्र परवाना देण्यात आला आहे. गुंड घायवळ पासपोर्ट मिळवतो, देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे? राज्यात गुंडांना पासपोर्ट, शस्त्र परवाना मिळावा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. गुंडांना पोसण्यासाठी महायुती सरकारने आता लाडका गुंड योजना आणावी या अंतर्गत शस्त्र परवाने द्यायला विशेष काऊंटरची व्यवस्था करावी, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
या गुंडांचा वापर निवडणुकीतही करता येईल
गुंडांना शस्त्र परवाने वेळेत मिळावे म्हणून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना शस्त्र परवाने वाटपाचे काम देऊन टाकावे ,म्हणजे या गुंडांचा वापर निवडणुकीतही करता येईल असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. काँग्रेस नेत्यांसह ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असे योगेश कदम यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले होते.