Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 10:44 IST2025-07-10T10:43:19+5:302025-07-10T10:44:00+5:30
माझी मातृभाषा गुजराती आहे पण माझी तिसरी पिढी इथे राहतेय. लहानपणापासून माझ्यावर मराठीचे संस्कार झाले असं नयन शाह यांनी सांगितले.

Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि अमराठी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. राज्य सरकारने पहिल्याच्या वर्गापासून हिंदी सक्ती लागू केली आणि तिथून सुरू झालेला वाद मराठी भाषिकांच्या तीव्र विरोधापर्यंत गेला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात सर्वपक्षीयांना आवाहन करत ना कुठला झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा म्हणत मोर्चाची घोषणा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद देत मोर्चात उतरणार असल्याचे म्हटलं. ठाकरे बंधू पहिल्यांदाच या निमित्ताने एकत्र आल्याचे चित्र राज्याला दिसले. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. मराठी भाषिकांच्या आग्रहापुढे राज्य सरकार झुकले त्यामुळे ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचं आयोजन केले. याच मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका खास मित्राचा उल्लेख केला. हा मित्र जन्माने जरी गुजरातचा असला तरी तो इथे मराठीत बोलतो असं सांगत राज यांनी नयन शाह यांचा उल्लेख केला.
याच नयन शाह यांच्याशी लोकमत मुंबईच्या प्रतिनिधी निधी पेडणेकर यांनी संवाद साधला. या मुलाखतीत नयन शाह म्हणाले की, माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण होता. मी राज ठाकरेंचे आभार मानेन. नयन शाह हे नाव फक्त निमित्त मात्र होते, उदाहरण होते, त्यामागचे सांगण्याचा उद्दिष्ट म्हणजे एवढी वर्ष जे अमराठी लोक इतकी वर्ष महाराष्ट्रात, मुंबईत राहतात त्यांना मराठी आलीच पाहिजे हा आहे. त्यांचे म्हणणं मला पटते. पिढ्यानपिढ्या आपण इथे राहत असू तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे. जन्माने मराठी आहे ते मराठीच, परंतु आमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे तर आम्ही मराठीच आहोत. मराठी भाषा प्रत्येकाने शिकली पाहिजे. सोपी मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे. मराठी भाषा हे माध्यम आहे. तुम्हाला साहित्यिक मराठी आली पाहिजे असं म्हणणं नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठी भाषेसाठी मुंबईत आंदोलन करावे लागत असेल तर दुर्दैवी आहे. ठाकरे बंधू एकत्र आलेच परंतु मराठी माणूस एकत्रित आला आहे. ज्यांचे या राज्यावर प्रेम आहे. मग तो जन्माने इथला नसला तरी तो मराठीच आहे. महाराष्ट्रावर माझे प्रेम आहे तर मी मराठीच आहे. मी विजयी मेळाव्यात गेलो होतो, माझी मुलेही गेली होती. जायलाच पाहिजे. यामागे कुठलेही राजकारण नाही. त्या मेळाव्यात कुठलाही झेंडा नव्हता. पक्षाची घोषणा नव्हती. मी जेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित पाहिले तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते. हा अविस्मरणीय क्षण होता. जे वातावरण तिथे होते, लोकांचे जे ठाकरेंवर प्रेम आहे ते तिथे दिसत होते अशा भावना नयन शाह यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, माझी मातृभाषा गुजराती आहे पण माझी तिसरी पिढी इथे राहतेय. लहानपणापासून माझ्यावर मराठीचे संस्कार झाले. मराठी सिनेमा, मराठी नाटके पाहत आलो. मराठी गाणी ऐकली, पुस्तके वाचत आलो. मित्र मराठी आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार दिलेत, मीरारोडमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी दिली नाही त्यामुळे संघर्ष झाला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देता मग मराठी माणसांना का दिली नाही हा प्रश्न आहे असंही नयन शाह यांनी म्हटलं.
राज ठाकरेंशी मैत्री कशी?
गेल्या २५ वर्षापासून राज ठाकरेंसोबत माझी मैत्री आहे. आम्ही एकाच परिसरात राहतो, त्यातून ओळख झाली. राज ठाकरे हा माणूस कुणाला कळला नाही. ते संकुचित विचारांचे आहेत असा आरोप केला जातो. मराठी मराठी करतात, पण तसं नाही. मी गुजराती आहे, मला त्यांनी सामावून घेतले. ते जे बोलतात ते योग्य बोलतात. जो इथे इतकी वर्ष राहतो त्याला मराठी आली पाहिजे असं ते सांगतात तसेच जो गुजरातमध्ये राहतो त्याला गुजराती आली पाहिजे. बंगालमध्ये जो स्थायिक झाला त्याला बंगाली आली पाहिजे. हा विचार पटतो. राज ठाकरे जे म्हणतात ते समजून घेतले पाहिजे. एक मित्र म्हणून नव्हे तर सामान्य माणूस म्हणून मी माझे मत व्यक्त करतो असं नयन शाह यांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ