“श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार अन् अजितदादांचा गट, काँग्रेस म्हणजे...”: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:43 IST2024-07-24T16:40:35+5:302024-07-24T16:43:35+5:30
Prakash Ambedkar News: मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही. राज्यकर्ते खरी परिस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

“श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार अन् अजितदादांचा गट, काँग्रेस म्हणजे...”: प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar News: अनेक ओबीसी संघटना, ओबीसी नेते, शरद पवार यांनी यात्रेत यावे, असे आम्ही आमंत्रण दिले आहे, निमंत्रण दिले आहे. पण, कोणीही काही रिप्लाय दिला नाही. फटका बसेल म्हणून राजकीय नेत्यांनी काही भूमिका घेतली नाही. सामान्य माणसाला दिशा देणारे कोणीही नाही. मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही. राज्यकर्ते खरी परिस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनीआरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर भूमिका मांडली.
ओबीसी आणि मराठा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत
राजकीय पक्षांच्या भूमिका आपण पाहिल्यात तर महत्वाच्या विषयावर ते लक्ष देत नाहीत. ओबीसी आणि मराठा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, अशावेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे पक्ष जातींचे पक्ष आहेत, श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष,काँग्रेस आणि अजित पवार यांचा पक्ष तर कायस्थ प्रभू म्हणजे भाजप व शिवसेना ठाकरे गट यांचा पक्ष आहे. त्यामुळेच आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, राज्यात सध्या ओबीसी घाबरलेला आहे. लहान ओबीसी कार्यकर्त्यावर हल्ला होत आहेत. शांतता प्रस्थापित व्हावी हाच उद्देश यात्रेमागे आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. जरांगे पाटील थेट त्यांना आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण रद्द करा म्हणत आहेत. आपले आरक्षण जाईल असे ओबीसींना वाटत आहे. त्यामुळे जिथे वाईट प्रकार झाला, तिथे आळा घालण्याचे काम आम्ही करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.