“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:08 IST2025-05-21T11:06:29+5:302025-05-21T11:08:33+5:30
Prakash Ambedkar News: त्या पदाची प्रतिष्ठा राखणे हे सरन्यायाधीश गवई यांचे कर्तव्य आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
Prakash Ambedkar News: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात शरद पवार गट सामील होईल असेच काहीसे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत आहेत. भारत पाक अघोषित युद्धात चांगले काम केल्याचे सर्टिफिकेटही शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिले. शरद पवार आता भाजपामय होत आहेत, असे दिसत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजपा हा पक्ष वगळता कोणाशीही युती करायला तयार आहोत. राज्यात जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षच नाही. जे कोणी आहेत त्यांची आणि सत्ताधाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळे कोणत्याच मुद्यावर कोणी प्रश्न उपस्थित करीत नाही, ही आजची स्थिती आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांवर निशाणा साधला.
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळ वापसीचा ओबीसींना काय फायदा होईल, याबाबत साशंक
छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असला तरी त्याचा ओबीसी समाजाचा काय फायदा होईल, याबाबत मला शंका आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना फी परवडत नाही, हे दिसत आहे. प्रवेश मिळाला, तरी ते घेत नाही, अशी परिस्थिती आहे. छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा घेऊन लढतील, ते पाहू, असे प्रकाश आंबडेकर म्हणाले.
दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत व गरिमा राखली पाहिजे. जेव्हा ते खुर्चीवर बसतात, तेव्हा ज्यांनी त्यांच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केले, अशा सेक्रेटरींना त्यांनी नोटीस बजावली पाहिजे. तुम्हाला लोकांनी त्या पदावर बसवले आहे, त्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा राखणे तुमचे कर्तव्य आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.