वारी-अखंड संकीर्तन

By Admin | Published: July 2, 2017 01:22 AM2017-07-02T01:22:15+5:302017-07-02T01:31:06+5:30

पंढरपूरचा वारी सोहळा हे अखंड संकीर्तन आहे. कीर्तनाचे तीन प्रकार सांगितले आहेत. पहिले गुणसंकीर्तन, दुसरे लीला संकीर्तन तर तिसरे

Vari-monolithic shrinking | वारी-अखंड संकीर्तन

वारी-अखंड संकीर्तन

googlenewsNext

- डॉ. रामचंद्र देखणे

पंढरपूरचा वारी सोहळा हे अखंड संकीर्तन आहे. कीर्तनाचे तीन प्रकार सांगितले आहेत. पहिले गुणसंकीर्तन, दुसरे लीला संकीर्तन तर तिसरे नामसंकीर्तन होय. अखंड नामगजर करीत होणारी वारीची वाटचाल हे नामसंकीर्तन आहे. संत साहित्याच्या भव्य प्रासादात कीर्तन हे सर्व रसांनी परिपूर्ण असे समृद्ध दालन आहे ते आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचे स्वतंत्र लोकविद्यापीठ आहे. कीर्तन परंपरेचे भक्तीसंप्रदायातील स्थान महत्त्वपूर्ण आहे. भागवतामध्ये नवविद्याभक्ती सांगितली आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवमम्
अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आमनिवेदनम्।
या नवविद्या भक्तीपैकी दुसरा भक्तीप्रकार म्हणून कीर्तनाला अत्यंत महत्त्व आहे. आविष्कारातून सादर होणारी कीर्तनकला ही कीर्तनभक्तीच्या रूपात प्रथम अवतरली आणि कीर्तनभक्तीची एक अवस्था म्हणून लोकप्रिय झाली. भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील ‘सततं कीर्तयन्तो मां...’ या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी अतिशय सुंदर ओव्या लिहिल्या आहेत. परमात्म्याचे वस्तिस्थान म्हणजे कीर्तन. भगवान म्हणतात, ‘अरे अर्जुना एकवेळ मी वैकुंठात नसतो. एकवेळ सूर्यबिंबातही असत नाही. मी योग्यांची मनेही उल्लंघून जातो, त्यामुळे मी हरविलो की काय असे वाटले, पण
परितयापाशी पांडवा ।
मी हरपला गिंवसावा।
जेथ नामघोषु बरवा।
करिती ते माझे।।
माझे हरिविश्लेषण नक्की कुठे सापडणार तर माझे भक्त ज्या ठिकाणी माझा नामगजर करीत माझे संकीर्तन करतात त्या ठिकाणी मी आवर्जून गवसणार. कीर्तनातही देव नेमका कुठे असतो? तो देवळात असतो, की गाभाऱ्यात की सभामंडपात? इथे असतो की नाही हे माहिती नाही.
कीर्तनात तो सांगणाऱ्याच्या मुखात असतो की नाही हेदेखील सांगता येणार नाही. तो सांगणाऱ्याच्या मुखात नसतो पण ऐकणाऱ्याच्या कानात असतो. परमेश्वराचे रूप कानाने ऐकावे आणि मनात साठवावे. हे कीर्तनाचे प्रयोजन. म्हणून संत एकनाथ महाराज कीर्तनाचे स्वरूप सांगताना म्हणतात की,
जेणे करूनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची
ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची।
अंतरी भगवंताची मूर्ती ठसावी. यासाठी कीर्तन आहे. ज्याच्या योगे मानवी मन दिव्यतेकडे आणि देवत्वाकडे झेपावले, ती अवस्था म्हणजे कीर्तन होय. वक्ता आणि श्रोता यांच्यातील अनयानंदाची अनुभूती म्हणजे कीर्तन. कीर्तनात वक्ता आणि श्रोता आहे; पण सांगणे आणि ऐकणे यात अद्वैत आहे. म्हणून कीर्तनाची व्याख्या करताना असे म्हणावे लागेल की द्वैतभावाचे सांगणे, अद्वैैत भावाचे ऐकणे आणि प्रेमभावाचे होणे म्हणजे कीर्तन. सांगणारा वेगळा आहे, ऐकणारे श्रोते वेगळे इथे द्वैैत आहे तर सांगणारा न सांगणारा आहे, ऐकणारे तेच ऐकणार आहेत. इथे अद्वैैत आहे. पण द्वैैताद्वैैताच्या पलीकडे प्रेमभाव इथे ओसंडून वाहतो आहे. संतांनी आपली प्रेमानुभूती व्यक्त करण्यासाठी कीर्तनाचे माध्यम उभे केले आणि वक्ता-श्रोत्यांमधून संवादाचे व्यासपीठ उभे राहिले.
कीर्तन हा एक संवाद आहे. एकीकडे परमात्म्याशी होणारा कीर्तन हा एक संवाद आहे; तर दुसरीकडे लोकांशी गुणसंकीर्तनाला भगवंताचा गुणानुवाद करावा. तो व्यक्त की अव्यक्त, सगुण की निर्गुण, साकार की निराकार त्याच्या स्वरूपाच्या तत्त्वचिंतनाचा गुणानुवाद जिथे होतो ते गुणसंकीर्तन सिद्धान्ताची मांडणी करीत परमेश्वराच्या नावाचे निरुपम इथे होते. तर लीलासंकीर्तनात भगवंताच्या लीला सांगितल्या जातात. लीलासंकीर्तनातून पुढे ललित आले. भारुडे आली, दशावतार आले आणि लोकरंगभूमीचा जन्म झाला.
ज्याला शास्त्रार्थाचे ज्ञान आहे, तत्त्वज्ञानाची मांडणी करता येते तो गुणसंकीर्तन करील. ज्याला उत्तम गाता येते, कथा सांगता येते तोच उत्तम लीला संकीर्तन करेल; पण ज्याला हे दोन्ही जमत नाही त्याला कीर्तन कसे घडणार?
याचा संतांनी बारकाईने विचार केला आणि सर्वांसाठी नामसंकीर्तन उभे केले. ज्ञानदेवांनी या नामसंकीर्तनाचे मोठेपण सांगताना एक सुंदर ओवी सांगितली आहे..
कधि एखाद्येनि वैैकुंठा जावे।
ते तिही वैैकुंठचि केले आ...।
तैैसे नामघोष गौरवे।
घवळले विश्व।।
एखाद्याला वैैकुंठाची प्राप्ती होते पण या संतांनी नामगजरात वैैकुंठच उभे केले आणि नामसंकीर्तनाने संपूर्ण विश्व प्रकाशित झाले. विश्वाला ज्ञानदीप लावण्याचे सामर्थ्य कीर्तनाला लाभले आहे, हे आता विश्वासपूर्वक सांगताना नामदेवराय म्हणतात..
नाचू कीर्तनाचे रंगी ।
ज्ञानदीप लावू जगी।।
वारीच्या वाटेवरचे प्रत्येक पाऊल हे नामगजरात पडत असते म्हणून प्रत्येक पावसागणिक इथे वैकुंठ उभे राहते. संतांनी आपले आत्मचिंतन करण्यासाठी ग्रांथिक प्रबंध रचना केली पण आपले आत्मानुभव मांडण्यासाठी मात्र कीर्तनाला उभे केले.
भागवतात दैवी कीर्तनाचे वर्णन आले आहे. क्षुकांनी परिक्षीनाला भागवत सांगितले- तिथे श्रीहरी प्रकटले. सर्व जण संकीर्तन करू लागले. प्रल्हादाने ताल (टाळ) धरला, नारदाने वीणा वाजवली, अर्जुनाने गायन केले. इंद्राने पखवाज वाजवला. सनकादिकांनी जयजयकार केला आणि सामिनयाने शुक्रदेवांनी कीर्तन केले. श्रीहरीसह सर्व जण नाचले. देवालाही देवपण विसरून नाचविण्याचे सामर्थ्य कीर्तनात आहे. जनाबाई ही संत नामदेवांच्या कीर्तनाची श्रवणभक्त आणि साक्षीदार. त्यांनी नामदेवांच्या कीर्तनाचे सुंदर वर्णन केले
आहे..
एकचि टाळी झाली चेहभागे वाळवंटी।
माझा ज्ञानराज गोपालाते लाह्या वारी।
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग।
जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग।।
चंद्रभागेच्या वाळवंटी नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले. नामगजराने वाळवंट दुमदुमले. ज्ञानोबांनी सुंदर आवाजात कीर्तनाच्या अंभगाचे चरण म्हटले आणि नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग देहभाग विसरून नाचले. नामदेवांच्या कीर्तनात ज्ञानदेवांनी चरणगान करणे आणि देवाने नाचावे हा केवढा प्रासादिक योगायोग.
अगदी अलीकडच्या काळातील एक प्रसंग आठवतो. श्री. पु.ल. देशपांडे यांनी स्वत:च तो प्रसंग सांगितला..
साने गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईच्या विल्सन कॉलेजच्या पटांगणात आचार्य अत्र्यांनी कीर्तन केले होते आणि अभंग म्हणायला आणि टाळ धरायला स्वत: पु.ल. देशपांडे होते. हासुद्धा एक निरुपम योगायोग म्हणावा लागेल. अध्यात्म संगीत, प्रबोधन, संवाद या भूमिकेतून कीर्तन परंपरा केवढी सामर्थ्यशाली आहे, हे लक्षात येते.
त्या परंपरेशी आपले नाते जोडावे असे प्रज्ञावंतांना वाटले. लोकमान्यांनीही म्हटले होते की, मी पत्रकार झालो नसतो तर कीर्तनकार झालो असतो. संत वाङ्मयातील चिंतनतत्त्व, कयातत्त्व आणि संगीतत्त्व हे जिथे एकवटते तिथे कीर्तन परंपरा उभी राहते. संतांच्या अनुभूतीला लोकानुभूतीची पदवी प्राप्त झाली ती कीर्तनामुळे.
कीर्तनामध्ये नृत्य आहे, नाट्य आहे, अभिनय आहे, संवाद आहे, वेदान्त मांडणी म्हणजे तत्त्वज्ञान आहे, संगीत आहे, हे सारे आविष्काराचे रंग जिथे एकवटतात तिथेच अवघा रंग एक झाला. तो रंग म्हणजे कीर्तनरंग. तो रंग म्हणजे पांडुरंग. या पांडुरंगाच्या कीर्तनरंगी रंगून वारकरी पंढरपूरपर्यंत वाटचाल करतो आणि जीवनाचा रंग परमात्म्याच्या रंगात एकरूप होऊन जातो.
 

Web Title: Vari-monolithic shrinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.