Vaibhav Khedekar Raj Thackeray MNS: "राज ठाकरे साहेब, आपण फार घाई केली. तुम्ही कालही मनात होतात. आजही आहात आणि उद्याही असाल. ३० वर्षे कुटुंब म्हणून पक्षाशी जोडलो गेलो होतो. आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधांना ब्रेक मिळाला. आजचं पत्र पाहून धक्का बसला. असं पत्र मला कधीच अपेक्षित नव्हतं. हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही. आता पुढील निर्णय घ्यावा लागेल", अशा भावना मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक पदी काम केलेल्या वैभव खेडेकर यांनी व्यक्त केल्या. वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
मनसेने हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. "सोशल मीडियावर माझ्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून अतिशय दुःख वाटले. हे पत्र माझ्या निष्ठेचे प्रमाणपत्र आहे. कोकणात मी पक्षाची बिजं रुजवली. खेड नगर परिषदेत माझ्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्ता मनसेकडे होती. आघात झाले, तेव्हा मी लोकांसोबत राहिलो. पक्ष रुजावा हीच माझी भूमिका होती", असे वैभव खेडेकर म्हणाले.
नितेश राणेंची भेट का घेतली? वैभव खेडेकरांनी सांगितले कारण
ज्या भेटीमुळे वैभव खेडेकर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला हवा मिळाली, त्याबद्दलही त्यांनी मौन सोडले.
खेडेकर म्हणाले, "मी भाजपच्या काही लोकांना भेटलो म्हणून पक्षांतर करणार असल्याच्या संशयातून माझ्यावर कारवाई करण्यात आली. पण, मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्यावरील तडीपारीची कारवाई थांबवावी म्हणून मी नितेश राणेंना भेटलो होतो", असा खुलासा त्यांनी केला.
मी राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...
वैभव खेडेकर म्हणाले, "मी विकास कामांसाठी सत्ताधाऱ्यांना भेटायचो आणि त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली. मात्र, माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. यासंदर्भात मी राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला. पण, मला अजूनही भेट मिळालेली नाही."
"संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. हे माझं दुर्दैव आहे. हे पत्र स्वतः राज ठाकरेंनी काढलं असतं, तर तो त्यांचा आदेशा आल्याचा मला आनंद झाला असता. मी पक्षाची शिस्त बिघडेल, असे काम कधीच केले नाही. पक्षासाठी केलेली धडपड आज तोकडी पडली", अशी खंत वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली.