शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा; राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ, आजही यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 07:34 IST2026-04-03T07:27:36+5:302026-04-03T07:34:37+5:30

तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशः महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Unseasonal Rains Batter Maharashtra Agriculture Standing Crops and Grape Farms Face Severe Damage | शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा; राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ, आजही यलो अलर्ट

शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा; राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ, आजही यलो अलर्ट

मुंबईः गेले दोन दिवस राज्याच्या काही भागात सलग वादळी पावसाने हजेरी लावत शेतीवर मोठा आघात केला आहे. गुरूवारी पावसाचा जोर वाढला असून राज्यात सर्वत्र हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचे चित्र आहे. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा पिके असून द्राक्षबागांचा हंगामही अंतिम टप्यात आला आहे. बेदाणा प्रक्रियेत या पावसाने मोठा अडथळा आणला असून तयार मालाचेही मोठे नुकसान केले आहे. उद्याही निम्म्या राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा 

धुळे जिल्ह्यात निसर्गाचा प्रकोप सुरूच असून, गुरुवारी (२ एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाने भीषण गारपीट केली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह चक्रीवादळाने हाताशी आलेला घास हिरावला असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. साक्रीसह मालपूर, कासारे, धाडणे आणि आष्टाने परिसरात विजांच्या कडकडाटांसह गारांचा पाऊस झाला. काढणीला आलेला गहू, हरभरा आणि मका जमिनदोस्त झाला. शेतात पाणी साचल्याने उन्हाळी कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे.

विजांच्या कडकडाटामुळे अडीचशे कोंबड्या दगावल्या

लातूर जिल्ह्यात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस होऊन १ हजार ३४५ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. दरम्यान, विजांच्या कडकडाटामुळे घाबरून रेणापूर तालुक्यातील गरसुळी तांडा येथील २५० कोंबड्या दगावल्या. सध्या ज्वारीची काढणी सुरू आहे. द्राक्ष, टरबूज, खरबुजाची तोडणी सुरू आहे. मात्र, अवकाळी पाऊस झाल्याने पिकांबरोबर फळबागांना फटका बसला आहे. आंब्याच्या झाडांखाली कैऱ्यांचा सडा पडल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्याच्या रस्त्यांवर अवकाळीच्या लाटा !

पुणे शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह पुणेकरांची दाणादाण उडवली. तासाभराच्या तुफानी पावसाने पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले. जणूकाही समुद्राच्या लाटाच उसळत आहेत, अशीच स्थिती रस्त्यांवर पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागांत पाणी शिरले आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. शहरात अनेक ठिकाणचे चेंबर तुंबल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, झाड पडल्याने सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती येथे एका फूल विक्रेच्या महिलेचा मृत्यू झाला. अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

वर्धा जिल्ह्याला अवकाळी वादळाचा तडाखा 

वर्धा जिल्ह्यात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात काही घरांची पडझड झाली, काही घरांवरील छपरे उडून गेली. काढणीला आलेला गहू पावसामुळे क्षतिग्रस्त झाला. पावसामुळे रब्बीतील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

३५ हजार हेक्टरवरील हळदीवर वळवाचा मारा

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीला आलेली आणि वाळवणीसाठी शेतात पसरून ठेवलेली हळद या पावसामुळे भिजली असून, हळदीचे कोठार मानल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सध्या हळद काढणीचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. उकडल्यानंतर वाळवणीसाठी शेतात ठेवलेली हळद पावसामुळे काळवंडण्याची भीती आहे. पाऊस आणि आर्द्रतेमुळे हळदीच्या रंगावर आणि गुणवत्तेवर परिणाम होतो, ज्यामुळे भाव कमी मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई देणार

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना तत्काळ योग्य पद्धतीने पंचनामे करण्यात यावे असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये मंदिरावर पडली वीज 

नाशिक शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी (दि. २) दुपारनंतर झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह दाणादाण उडवली. पावसादरम्यान चास येथील श्री बालाजी मंदिरावर वीज कोसळली. या घटनेत मंदिराचा कळस व लोखंडी आधार वाकल्याचे दिसून आले.

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात पावसामुळे द्राक्ष, कांदा, हरभरा, भुईमूग पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मालेगाव येवला तालुक्यातील पश्चिम भागातील गावांनाही पावसाने झोडपले. दिंडोरी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने यात्रेच्या उत्साहावर विरजण पडले.

वैभववाडीला अवकाळीचा तडाखा 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्याला गुरुवारी (दि.२) सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी थांदल उडाली असून, आठवडाभरात तिसऱ्यांदा पाऊस झाल्याने काजू बागायतदार अडचणीत सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत- दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री
 

Web Title : बेमौसम बारिश ने महाराष्ट्र के किसानों को तबाह किया; येलो अलर्ट जारी।

Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश और ओलावृष्टि से अंगूर, गेहूं और हल्दी सहित फसलों को भारी नुकसान हुआ है। किसानों को भारी नुकसान का सामना करना पड़ रहा है क्योंकि काटी गई उपज बर्बाद हो गई है। कई जिलों में लगातार बारिश के लिए येलो अलर्ट जारी किया गया है, जिससे कृषि संकट बढ़ गया है। मुआवजे का वादा किया गया है।

Web Title : Unseasonal rains devastate Maharashtra farms; yellow alert issued for more rain.

Web Summary : Unseasonal rains and hailstorms have severely damaged crops across Maharashtra, including grapes, wheat, and turmeric. Farmers face substantial losses as harvested produce is ruined. A yellow alert has been issued for continued rainfall in several districts, compounding the agricultural crisis. Compensation is promised.