Maharashtra Politics: मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेला मोर्चा, सरकारने काढलेले जीआर आणि त्यावरून ओबीसी समाजाची नाराजी यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह अनेक मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठेवल्या होत्या. या आंदोलनादरम्यान विरोधकांनी अनेक सल्ले दिले. या सल्ल्यांवरून केंद्रीय मंत्र्यांनी ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे.
एकीकडे राजकारण सुरू असताना दुसरीकडे मात्र गणेशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण सर्वदूर होते. अनेक नेते मंत्री एकमेकांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे यांनीही विविध ठिकाणी आवर्जून हजेरी लावत बाप्पा चरणी नतमस्तक झाले. अशातच केंद्रीय मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
ठाकरे 'त्यांच्या'मुळे सत्तेवरून पायउतार
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे अलीकडेच आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारला. जाधव यांनी अन्य मुद्दे बाजूला सारत खा. संजय राऊत यांच्यावरच थेट निशाणा साधला. खा. राऊत यांनी आंदोलकांना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे जागा देण्याची सूचना केली होती. त्यांच्या सल्ल्याचा आधार घेत जाधव म्हणाले की, 'त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले. भाजपप्रणीत सरकारला काय करायचे ते कळते. सल्ल्याची आम्हाला गरज नाही.' जाधव यांच्या या वक्तव्यानंतर खा. राऊत काय प्रत्त्युत्तर देतात याची उत्सुकता आहे.
दरम्यान, अमित शाह म्हणतात की, भाजपाचा महापौर मुंबईत होईल. याचाच अर्थ तो मराठी माणूस असणार नाही. या गोष्टीला एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. परंतु, आम्ही सांगतो की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकेल आणि मराठीच महापौर होईल. हे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासह दिल्लीकरांनाही देत आहे. जा, तुम्ही काय करायचे ते करा, मुंबईत मराठी माणूसच महापौर होईल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.