union minister nitin gadkari tells funny incident about amitabh bachchans phone call | 'नाटक मत कर, चल फोन रख'; गडकरींनी कट केला होता बिग बींचा कॉल

'नाटक मत कर, चल फोन रख'; गडकरींनी कट केला होता बिग बींचा कॉल

नागपूर: बिग बी अमिताभ बच्चन यांचा फोन एकदा आपण कट केला होता, असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितला. फार पूर्वी माझी आणि अमिताभ बच्चन यांची फारशी ओळख नव्हती. त्यावेळी अमिताभ यांनी मला फोन केला होता. मात्र कोणीतरी मुद्दाम गंमत करतंय, असा मला वाटलं आणि मी फोनच कट केला, अशा शब्दांमध्ये गडकरींनी खुमासदार किस्सा उपस्थितांना सांगितला. नागपूरातील दक्षिणामूर्ती मंडळाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत घडलेले अनेक प्रसंग, मजेशीर किस्से आणि आठवणी नागपूरकरांना सांगितल्या. 

काही वर्षांपूर्वी मला एक फोन आला होता. हॅलो, मैं अमिताभ बोल रहा हूँ, असं समोरची व्यक्ती म्हणाली. त्यावेळी माझी आणि अमिताभ यांची फारशी ओळख नव्हती. त्यामुळे कोणीतरी उगाच आवाज बदलून बोलतंय, असा माझा समज झाला. त्यामुळे नाटक मत कर, चल फोन रख असं म्हणत मी फोन कट केला. त्यानंतर पुन्हा समोरच्या व्यक्तीनं मला फोन केला आणि आपण खरंच अमिताभ असल्याचं सांगितलं, असं म्हणत गडकरींनी कित्येक वर्षांपूर्वी घडलेला किस्सा नागपूरकरांसोबत शेअर केला. 

अनौपचारिक गप्पा मारताना गडकरी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीवर भरभरुन बोलले. 'आपण महाराष्ट्रात राहतो. इथले पदार्थ आपल्यासाठी नवीन नाहीत. ते आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात असताना त्यांच्याबद्दल फारसं काही वाटत नाही. मात्र राज्याबाहेर, देशाबाहेर गेल्यावर त्यांची आठवण येते,' असं गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचा किस्सा सांगितला. एक दिवस गेट्स दाम्पत्य दिल्लीत भेटीसाठी आलं होतं. तेव्हा माझ्या पत्नीनं त्यांच्यासाठी मिसळ पाव केला होता. तो मेलिंडा यांना अतिशय आवडला होता, असं गडकरींनी सांगितलं. 

दिल्लीतील अनेक नेते, बॉलिवूडचे अनेक कलाकार अनेकदा केवळ मराठी पदार्थांची चव चाखण्यासाठी घरी येतात, असं गडकरी म्हणाले. 'सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी थालीपीठ अतिशय आनंदानं खाते. सुरेश प्रभूंनी एकदा माझ्याकडून नेलेल्या रश्यावर जवळपास पाच दिवस ताव मारला होता. जॅकी श्रॉफ एकदा घरी आला असताना तो केवळ वरण प्यायला होता. इतकं त्याला वरण आवडतं. सलमान खान पोहे अतिशय आवडीनं खातो. हेमा मालिनी तर अनेकदा माझ्या जेवणाची वेळ विचारुन येतात,' असे अनेक किस्से गडकरींनी यावेळी सांगितले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: union minister nitin gadkari tells funny incident about amitabh bachchans phone call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.