उल्हासनगर भाजपातील फूट मुख्यमंत्र्याच्या जिव्हारी, पक्ष सोडून गेलेल्याच्या फोटोला भाजपा संतप्त पदाधिकाऱ्यानी फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:55 IST2025-11-18T17:55:17+5:302025-11-18T17:55:54+5:30
उल्हासनगर भाजपमध्ये निष्ठावान गटाचे तब्बल सहा नगरसेवक पक्ष सोडून शिंदेसेना आणि ओमी कलानी टीममध्ये सामील झाल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

उल्हासनगर भाजपातील फूट मुख्यमंत्र्याच्या जिव्हारी, पक्ष सोडून गेलेल्याच्या फोटोला भाजपा संतप्त पदाधिकाऱ्यानी फासले काळे
उल्हासनगर भाजपमध्ये निष्ठावान गटाचे तब्बल सहा नगरसेवक पक्ष सोडून शिंदेसेना आणि ओमी कलानी टीममध्ये सामील झाल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा कार्यालयात पक्ष सोडून गेलेले माजी शहरजिल्हाध्यक्ष महेश सुखरामनी यांच्या फोटोला थेट काळे फासून आपला संताप व्यक्त केला. उल्हासनगरभाजपाचे माजी शहरजिल्हाध्यक्ष व महापालिकेत उपमहापौरसह अन्य पदे भूषविलेले पक्षातील निष्ठावंत गटाचे जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, प्रकाश माखीजा, राम चार्ली पारवानी यांनी ओमी कलानी गटात तर माजी नगरसेविका मीना सोंडे, किशोर वनवारी यांनी शिंदेगटात प्रवेश घेतल्याने, शहर भाजपाला मोठे खिंडार पडले.
संतप्त पदाधिकाऱ्यांनी माजी शहरजिल्हाध्यक्ष व नगरसेवक महेश सुखरामनी यांच्या कार्यालयातील फोटो काढून टाकून त्यावर शाईने काळे फासल्याची घटना घडली.
भाजपातून बाहेर पडलेल्या जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, प्रकाश माखीजा व राम चार्ली पारवानी यांनी महेश सुखरामनी यांच्या फोटोला काळे फासलेच्या घटनेनंतर भाजपात आता लोकशाही राहिली नसून ठोकशाही आल्याची प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली. आमदार कुमार आयलानी व शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी फोटोला काळे फासणाऱ्यावर कारवाई करावी. अशी मागणी पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांनी केली. शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांना याबाबत संपर्क केल्यानंतर, त्यांनी या घटणेबाबत कल्पना नसून माहिती घेवून प्रतिक्रिया देतो. असे सांगितले. पुरस्वानी, सुखरामनी, माखीजा व चार्ली हे भाजपाचे जुने नेते असून ते शहर पक्षाचे मुख्य पिलर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पक्षफुटीने भाजपाला हादरा बसला आहे.