Uddhav Thackeray wants to become Chief Minister, Sanjay Raut | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही राज्याची इच्छा - संजय राऊत
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही राज्याची इच्छा - संजय राऊत

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या बैठकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत लक्ष ठेवून आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले आहे की, तीन पक्षांचे सरकार येणार आहे. या तीन पक्षांची सत्ता स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी करावी लागेल. यासंदर्भातील दिल्लीत घडामोडी घडत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. 


याचबरोबर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटायला जाण्याची शक्यता नाकारता येणार आहे. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडले. कोणत्या विषयावर चर्चा झाली. याबाबची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना द्यावी लागेल. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे.  याशिवाय, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदी कोण असेल, याची माहिती सोनिया गांधींना देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे ही राज्याची इच्छा आहे. पण, हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 


दरम्यान,  राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 


यावेळी महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक झाली. ही चर्चा आज आणि उद्याही सुरु राहील, महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल. गेल्या काही दिवसातील अस्थिरता संपुष्टात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्यायी सरकार स्थापन  होऊ  शकत नाही. आम्ही लवकरच स्थिर आणि पर्यायी सरकार देऊ, सरकारबाबत चर्चा सकारात्मक सुरु आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 

Web Title: Uddhav Thackeray wants to become Chief Minister, Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.