Uddhav Thackeray vs Eknath Shinde: फोटो बरेच काही सांगतोय? ठाकरे गटाचे एक खासदार, एक आमदार...तानाजी सावंतांचे खांद्यावर हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:29 IST2023-02-19T18:27:44+5:302023-02-19T18:29:14+5:30
Shivsena Crisis: ठाकरे गटातील दोन खासदार आणि दहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत परतणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला होता.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: फोटो बरेच काही सांगतोय? ठाकरे गटाचे एक खासदार, एक आमदार...तानाजी सावंतांचे खांद्यावर हात
उस्मानाबादमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे खासदार, आमदार एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
ठाकरे गटातील दोन खासदार आणि दहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेत परतणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला होता. त्यातच या दोन खासदारांनी निवडणूक आयोगाला ठाकरे गटात राहुनही प्रतिज्ञापत्र दिले नव्हते. यामुळे हे कोण अशी चर्चा रंगलेली असताना त्यातच ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या खांद्यावर शिंदेंचे मंत्री तानाजी सावंतांचा हात पडल्याचा फोटो आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
मंत्री तानाजी सावंत यांनी खासदार निंबाळकर आणि आमदार पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा दिल्या. शिंदेंनी ठाकरे सरकार पाडल्यानंतर मंत्री सावंत, खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात अबोला आला होता. तो दूर झाला की शिंदेंच्या हातात शिवसेनेचीही सुत्रे गेल्याने ठाकरे गटाचे खासदार, आमदार तलवारी म्यान करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही वेळातच ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी देखील या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असे म्हटले आहे.