Uddhav Thackeray : "...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:41 IST2025-12-06T18:40:31+5:302025-12-06T18:41:46+5:30
Uddhav Thackeray : राज्यातील निवडणुका, मतदार याद्यांमधील घोळ, शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्षनेतेपद यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

Uddhav Thackeray : "...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
राज्यातील निवडणुका, मतदार याद्यांमधील घोळ, शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्षनेतेपद यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "बूथ कॅप्चरींग' ऐवजी अख्खी 'निवडणूकच कॅप्चर' करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा जनतेच्या हिताचा नाही" असं म्हणत निशाणा साधला. तसेच "विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रीपद रद्द करा" अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
"सत्ताधाऱ्यांमध्ये मारामारी सुरू आहे, आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये असे प्रकार होतात हे ऐकत होतो. बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या. आता 'बूथ कॅप्चरींग' ऐवजी अख्खी 'निवडणूकच कॅप्चर' करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा जनतेच्या हिताचा नाही. स्वत:च्या लोकांची घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशा वेळेला आपण सगळे सुजाण नागरिक शिवसेनेकडे येत आहात. कारण जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसतोय, जिच्या हातात मशाल आहे."
"विरोधी पक्षनेतेपदाला हे सरकार का घाबरतंय?"
"विरोधी पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद या दोन गोष्टी आहेत. कारण विरोधी पक्षनेतेपद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे, त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनात मागणी केली होती. पण आता एक वर्ष होऊन गेलं. एका वर्षात जाहिरातींशिवाय या सरकारने काहीही केलेलं नाही. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा असा काळ आला असेल की, दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाही आहेत. विरोधी पक्षनेतेपदाला हे सरकार का घाबरतंय? हे सरकार मजबूत आहे. दिल्लीचा या सरकारला पाठिंबा आहे."
"उपमुख्यमंत्री हे बिरूद लावता कामा नये"
"अनेक भ्रष्टाचारी सोबत घेतले आहेत, त्यांच्यावर त्यांनी पांगरूण घातलं आहे. एवढं करूनही विरोधी पक्षनेतेपदाला हे सरकार का घाबरत आहे. ताबडतोब या सरकारने दोन्ही सभागृहांसाठी विरोधीपक्षनेते जाहीर केले पाहिजे. तसेच कायदे दाखवणार असाल तरउपमुख्यमंत्रीपद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे. कारण संविधानात कुठेही तरतूद नाही. त्यामुळे त्यांच्याकडे काही खाती असतील, त्या खात्याच्या चाव्या किंवा बाथरूमच्या चाव्या द्या, पण त्यांनी उपमुख्यमंत्री हे बिरूद लावता कामा नये. कायद्यानुसार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या सरकारने विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या अधिवेशात जाहीर केली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.