'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:55 IST2025-10-01T17:49:20+5:302025-10-01T17:55:45+5:30
Ola Dushkal: ओला दुष्काळाच्या मागणीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे जुने पत्र वाचून दाखवलं

'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
Maharashtra Flood: अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित झाला असून विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा होता मात्र तसे झालं नाही. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, असं म्हणत सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओला दुष्काळासंदर्भातील पत्र दाखवत टीका केली.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. साखर सम्राटाप्रमाणे शेतकरीही भाजपात आल्यावरच कर्जमाफी करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात व्यस्त तर दुसरे उपमुख्यमंत्री अंगाला लावून घेत नाही आणि शेतकरी वाऱ्यावर पडला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला.
"मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीचे काही निकष असतात. मी केली तेव्हा काय निकष होते. माझ्याकडे कर्जमुक्ती कोणीच मागितली नव्हती. तरीसुद्धा मी माझे कर्तव्य म्हणून केले होते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम केअर फंडातून पैसे आणा. मी नुस्ता टीका करत नाहीये त्यातून मार्ग पण दाखवला आहे. सगळी थेरं बंद करा आणि महाराष्ट्रावर अन्याय करु नका," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी मला एक पत्र लिहीलं होतं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. "परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानाबाबत आतातरी तातडीने मदत देण्याबाबत. परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. मदतीसाठी तो आर्जव करत आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पाहून अतिशय वेदना होतात. या वेदना मला पण झाल्या. म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती. राज्य सरकारला पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचा आदेश दिल्याच्या पलीकडे सरकारकडून काहीही शब्द दिलेला नाही. प्रत्यक्षात पंचनामे होत नाही आणि शेतकऱ्यांना मदत तर होत नाही. शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता आता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषाप्रमाणे मदत दिली गेली पाहिजे," असं या पत्रात म्हटल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.