उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना फोन; विधानपरिषद नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 09:14 PM2020-04-29T21:14:55+5:302020-04-29T21:30:50+5:30

'विधानपरिषदेच्या जाहीर झालेल्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या, त्यामुळे राज्यात राजकीय पेच निर्माण होऊ नये म्हणून आपल्या नावाची शिफारस राज्यपालांकडे मंत्रिमंडळाने केली. मात्र त्यावरून ज्या पद्धतीचे राजकारण सुरू झाले आहे ते राज्यातल्या प्रशासनाला आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला नाउमेद करणारे आहे.'

Uddhav Thackeray Phones Narendra Modi, Will the way be cleared for appointment of Legislative Council? | उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना फोन; विधानपरिषद नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार?

उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना फोन; विधानपरिषद नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार?

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांना विधान परिषदेचे सदस्य देण्यावरून जे राजकारण सुरू आहे त्याविषयी ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली. 

आम्ही मंत्रिमंडळातील सगळे सदस्य केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाच्या लढ्यात सहभागी झालो आहोत. राज्य अत्यंत अडचणीतून जात आहे. रुग्णांची संख्या तात्काळ कमी करण्याचे मोठे आव्हान राज्यातील आणि केंद्रातील सरकारपुढे आहे. अशावेळी विधानपरिषदेच्या जाहीर झालेल्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या, त्यामुळे राज्यात राजकीय पेच निर्माण होऊ नये म्हणून आपल्या नावाची शिफारस राज्यपालांकडे मंत्रिमंडळाने केली. मात्र त्यावरून ज्या पद्धतीचे राजकारण सुरू झाले आहे ते राज्यातल्या प्रशासनाला आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला नाउमेद करणारे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची आहे, मात्र दुर्दैवाने जी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे त्यावरून आपल्याला चिंता वाटते असेही ठाकरे म्हणाल्याचे समजते. दरम्यान आमदारकीसाठी आपण पंतप्रधानांना फोन करणे योग्य नाही, त्यांना मागायचे असेल तर महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक मदत मागेन, असे मत ठाकरे यांनी महाआघाडीच्या नेत्यांनी पुढे व्यक्त केल्याचे समजते.

भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी ठाकरे जर पंतप्रधानांशी बोलले तर हा विषय मिटू शकतो अशी विधाने कालच केली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मोदी यांच्यातील संवाद चर्चेचा विषय बनला आहे. असा फोन झाला की नाही याविषयी शिवसेना आणि भाजप दोघांकडूनही कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र शिवसेनेचे काही नेते अशी चर्चा झाल्याचे खासगीत सांगत आहेत. याविषयी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात कोरोना त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सातत्याने चर्चा होत आहे. चार वेळा दोघांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स ही झाली. तसेच गृहमंत्री अमित शहा हे देखील ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले आहेत. त्यामुळे त्याचा लगेच असा अर्थ काढणे योग्य होईल असे वाटत नाही. दोघांमध्ये बोलणे झाले की नाही हे ते दोघेच सांगू शकतील असेही परब यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Uddhav Thackeray Phones Narendra Modi, Will the way be cleared for appointment of Legislative Council?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.