उद्धव ठाकरेंना पाच वर्षात विमा कंपन्यांचे कार्यालय दिसलं नाही का ? : धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:56 IST2019-06-23T15:54:18+5:302019-06-23T15:56:19+5:30
शिवसेनला निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आणि त्यांची लुट करणाऱ्या पीक विमा कंपन्यांची आठवण येते. उद्धवजी शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असेही मुंडे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना पाच वर्षात विमा कंपन्यांचे कार्यालय दिसलं नाही का ? : धनंजय मुंडे
मुंबई – पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची लावलेली लुट थांबली नाही तर, त्यांची मुंबईमधील कार्यालय बंद पाडू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यावरूनच विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उद्धव यांचा समाचार घेतला आहे. पीक विमा कंपन्याचे मुंबईतील कार्यालय मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांना दिसली नाहीत, आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसतात असा सवाल मुंडे यांनी केला आहे.
विमा कंपन्यांच्या एजंटनी शेतकऱ्यांना लुटलं आहे. समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत विमा कंपन्यांना दिला होता. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पीक विमा कंपन्या मागील ५ वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना उद्धव यांना कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणूकीच्या तोंडावरच कशी दिसतात, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.
शिवसेनला निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आणि त्यांची लुट करणाऱ्या पीक विमा कंपन्यांची आठवण येते. उद्धवजी शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असेही मुंडे म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या नावाने निवडणुका जिंकतात आणि त्याच छत्रपतींच्या नावाने कर्जमाफी योजना आणून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. आता पुन्हा शिवशाही सरकार म्हणून शिवरायांच्या नावाचा निवडणूकिसाठी वापर करत असल्याचा टोला मुंडे यांनी भाजपला लगावला.