कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 07:38 IST2025-11-26T07:37:37+5:302025-11-26T07:38:07+5:30

या सर्व धावपळीत ‘उद्धव साहेब आगे बढो‘ची कॅसेट वाजत राहिली. या प्रकाराची सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू होती.

Uddhav Thackeray name was chanted at Eknath Shinde's rally in Nagpur | कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात

कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात

शिंदेंसमोरच उद्धव साहेब आगे बढो...

नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी सोनटक्के यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी सभा झाली. शिंदे यांचे भाषण आटोपताच ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ हे गीत वाजविण्यात आले. या गीतामध्ये ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ असाही जयघोष उपस्थितांना ऐकू आला. गाणे ऐकताच उपस्थितांचे कान टवकारले. अजूनही उद्धव ठाकरे यांचीच कॅसेट शिवसेना (शिंदेसेना) का बरे वाजवित आहे, असा मिश्किल भाव अनेकांच्या चेहरावर उमटला. शिंदे सभा आटोपून निघाल्यानंतर कार्यकर्तेही त्यांच्या मागे जाऊ लागले. या सर्व धावपळीत ‘उद्धव साहेब आगे बढो‘ची कॅसेट वाजत राहिली. या प्रकाराची सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू होती.

दिघे साहेबांचे स्वप्न साकार होणार का?

नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिला महापौर शिवसेनेचा झाला. पण गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षाला कायम विरोधी पक्षनेते पदावरच समाधान मानावे लागले. काँग्रेससारख्या पक्षानेही पाचवेळा उपमहापौर व अनेकवेळा स्थायी समिती सभापतीपद मिळवले. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी नाईकांनी पक्ष फोडून ते स्वप्न धुळीस मिळवले. नवी मुंबईवर सत्ता मिळवणे हे  दिघे साहेबांचे स्वप्न होते. आता हेच स्वप्न 
साकार करायचे आहे, असा संदेश शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. दिघे साहेबांचे स्वप्न साकार होणार की, अंतर्गत गटबाजीमुळे पुन्हा सत्तेपासून दूर राहावे लागणार, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

वक्तव्य तळागाळात पोहोचतात तेव्हा...

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तुम्ही कट मारला तर मी पण कट मारेल.. हा कट निधी देण्याच्या अनुषंगाने होता. त्यामुळे साहजिकच दादांची ही ‘दादागिरी’ राज्यभर गाजली. आता तेच लोन थेट जिल्हापातळीवर पोहोचल्याचे दिसते. नगरपालिका निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने ‘साम, दाम, दंड, भेद’ यांच्या सगळ्याच युक्त्या सुरू झाल्या आहेत. चंद्रपुरातील एका बड्या भाजप नेत्याने ज्या ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक निवडून येईल, त्या वॉर्डात बोर्ड लावणार आणि तेथील नागरिकांनी काँग्रेसकडूनच विकास मागावा, असे लिहिणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे काँग्रेसकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. आता मतदार त्यांचे हे वक्तव्य उधळून लावतात की, त्या नेत्याला बोर्ड लावायला देतात हे कळेलच.

तिजोरी तुमची, पण मतदान आमचे...

तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, पण मालक आपल्याकडे असल्याचे म्हणत मंत्री चंद्रकात पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. मालक आपल्याकडे असल्याने विकासाची काळजी करू नका. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. पवार - पाटील यांच्या या शाब्दिक कलगी-तुऱ्यामुळे सामान्य मतदार संभ्रमात आहे. आता ही धमकी आहे की, विकासकामांची हमी, असा प्रश्न मतदारांनी विचारला तर काय होईल? तिजोरी कुणाची, चाव्या कुणाकडे, भाषणे कुणाची, याचे मतदारांना देणे-घेणे नाही. पण, मतदान त्याचे आहे हे नेत्यांनी विसरता काम नये?, असा सवाल मतदार करत आहेत.

पाऊले चालती निधीची वाट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचारात आम्हाला मतदान केले नाही तर निधी मिळणार नाही या विधानामुळे निर्माण झालेले वादळ शांत झाले नसताना सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही त्याच चालीवर ताल धरला. मंचरचा नगराध्यक्ष व सतराही नगरसेवक जिंकून दिल्यास विकासनिधीचा पूर वाहील. ही श्रेयाची लढाई नाही. मी आणला की तू आणला हा वाद नाही, असे ते म्हणाले. अहो! मग निधी देण्यासाठी आधी मते मिळतात का हे पाहताय का? हा प्रश्न मात्र जनतेच्या मनात रुतून बसला आहे. निधीचा पुर असो वा आश्वासनांचा पाऊस. मत मात्र आमच्या मनानेच टाकणार. तुमच्या इशाऱ्यांनी नाही हा निर्धार मात्र जनतेने केला आहे.  

Web Title : एकनाथ शिंदे के सामने 'उद्धव ठाकरे' के नारे लगने से भ्रम

Web Summary : शिंदे की रैली में ठाकरे के समर्थन में नारे लगे। राजनीतिक चालें और धन के वादे मतदाताओं में बहस छेड़ते हैं। नेताओं के बयानों से भ्रम पैदा होता है।

Web Title : Confusion as 'Uddhav Thackeray' slogans echo before Eknath Shinde.

Web Summary : Shinde faced awkward chants praising Thackeray at a rally. Political maneuvering and funding promises spark debate amongst voters. Leaders' statements stir confusion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.