उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:25 IST2022-08-30T13:25:28+5:302022-08-30T13:25:52+5:30
पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवारांना करणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलं.

उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला
मुंबई - मी २९ वर्षापासून भाजपाचं काम करतोय त्यामुळे सांगतो की, उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत. त्यांनी सारेकाही सोडून दिलंय. कौटुंबिक प्रेमात सगळं विसरले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कतृत्वाला बगल देऊन ते आपलं कार्य करतायेत. त्यांच्याबद्दल जास्त बोलता येत नाही. सध्या उद्धव ठाकरेंचे जे काही सुरू आहे ते गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका कोणती हे कळत नाही असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, विश्व हिंदु परिषदेचे, संघाचे कार्यकर्ते शिवसेनेत गेले माहिती नाही. आजकाल इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची पद्धत सुरू केली आहे. संभाजी बिग्रेड जे संघविचाराचे, विश्व हिंदु परिषदेचे कट्टर विरोधक आहेत त्यांच्याशी युती करतात. दुसरीकडे अशी भाषा वापरतात. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व खरेच बेगडी आहे. शरद पवार आणि काँग्रेस सोबत बसणाऱ्यांनी हिंदुत्वाच्या बाता मारु नये असंही त्यांनी म्हटलं.
तसेच शरद पवार यांनी यापूर्वी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला आहे परंतु कधीही ६० च्या वर गेले नाहीत. आतापर्यंत त्यांचे राजकारण पाहिले तर जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा कुणाला तरी तोडून, जोडून सत्तेत आलेत. त्यामुळे ते किती फिरले हे महत्त्वाचं नाही. कोरोना संकटात उद्धव ठाकरेंकडेही फिरण्याची संधी होती. लोक मरत असताना ते फिरले नाहीत. आता फिरतायेत. पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता करणार आहे असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शिवसेनेत रोजच प्रवेश होतायेत. मला अभिमान वाटतो की, सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेशासाठी रांग लागते. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसतंय. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म नाही. याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेकडे येतायेत. भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे. बजरंग दल, विश्व हिंदु परिषदेप्रमाणेच बहुजन, वंचित, मुस्लीम बांधवही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातलं हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते.