ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:19 IST2025-07-20T09:18:05+5:302025-07-20T09:19:00+5:30
मी आतासुद्धा फोन उचलून राजला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो. आम्ही आता भेटू शकतो असंही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबाबत सांगितले.

ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
मुंबई - आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर प्रहार केला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्यावर अधिक स्पष्टपणे भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसांची एकजूट अभेद्य आहे. हिंदी सक्तीच्या निमित्ताने भाजपा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहे पण तसे घडणार नाही. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही. मी आणि राज एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही तर इतर भाषिकांनासुद्धा अगदी मुस्लीम बांधवांनाही आनंद झाला आहे. कोणाला पोटशूळ झाला असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो असं त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राच्या मनात जे काही ते साकार होईल. २० वर्षांनी आम्ही एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणले पाहिजे असे नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे काही करण्याची आवश्यकता आहे ते मी करेन. यापुढे चर्चा होत राहील. पहिल्यांदा २० वर्षांनी एकत्र आलोय. आमची थेट चर्चा झाली तर अडचण काय...बाकी लपूनछपून भेटतात आम्ही उघड भेटू. मी आतासुद्धा फोन उचलून राजला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो. आम्ही आता भेटू शकतो असंही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंबाबत सांगितले.
दरम्यान, मराठी माणूस हा आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरे असतो. कोणावरही अन्याय करत नाही. हाच मराठी माणूस जर त्याच्यावर अन्याय झाला तर सहनही करत नाही. आता सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला म्हणूनच मराठी माणूस पिसाळलाय. जसा संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला तो पेटला होता तसाच तो आता पेटलेला आहे. कारण किती काळ हे सहन करायचं, आमची चूक काय असं त्याला वाटू लागलंय असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.