देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:17 IST2025-11-17T10:16:16+5:302025-11-17T10:17:40+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या दादर परिसरातील जुन्या महापौर बंगल्यात बनवले जात आहे. याबाबत सरकारने १५ नोव्हेंबरला अधिसूचना प्रकाशित केली.

देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
मुंबई - महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासवरील अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक काढून ही नियुक्ती जाहीर केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनाही सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी या नियुक्त्या असतील.
सरकारने स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, ठाकरेंसोबतच माजी मंत्री सुभाष देसाई यांची सचिवपदावर नेमणूक केली आहे. या समितीच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे, भाजपा आमदार पराग आळवणी, माजी आमदार शिशिर शिंदे असतील. त्याशिवाय शासनाचे मुख्य सचिव, नगर विकासचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त हे समितीचे पदसिद्ध सदस्य राहतील. या समितीत आणखी २ जणांची सदस्य म्हणून निवड होणे बाकी आहे. विशेष म्हणजे या समितीत उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असेल आणि पराग आळवणी, शिशिर शिंदे यांची नियुक्ती पुढील ३ वर्षासाठी असेल असं शासनाने म्हटलं आहे.
दादर येथे बनतंय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या दादर परिसरातील जुन्या महापौर बंगल्यात बनवले जात आहे. याबाबत सरकारने १५ नोव्हेंबरला अधिसूचना प्रकाशित केली. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. २०१६ साली स्मारक समितीची स्थापना उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या पदाचा राजीनामा दिला. २०२२ साली शिंदे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासून स्मारक समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती झाली नव्हती. या समितीवरून उद्धव ठाकरे यांना हटवण्याची मागणी शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनाच या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.