Mumbai: गोरेगावमध्ये पाणी टंचाई विरोधात उद्धव सेनेचा 'बादली मोर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:29 IST2025-10-20T18:26:43+5:302025-10-20T18:29:25+5:30
Shiv Sena UBT: गोरेगाव पश्चिममध्ये पाणी प्रश्नावरून उद्धव सेनेने प्रशासनाला इशारा दिला.

Mumbai: गोरेगावमध्ये पाणी टंचाई विरोधात उद्धव सेनेचा 'बादली मोर्चा'
मुंबई-गोरेगाव पश्चिम येथील पालिकेच्या पी दक्षिण सहाय्यक आयुक्त कार्यालयावर उद्धव सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ५२ येथील पाणी टंचाईच्या निषेधार्थ आज सकाळी प्रभाग क्रमांक ५२ चे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांच्या नेतृत्वाखाली बादली मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिवाळीची पहिली बंगाली कंपाउंड मधील दीपक परब यांना चक्क उटणे लावून महानगरपालिकेच्या गेटसमोर अंघोळ घालून आंदोलकांनी "पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे" “आमच्या मागण्या पूर्ण करा!” असा नारा देत निषेध व्यक्त केला अशी माहिती गाढवे यांनी दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने येथील सहाय्यक आयुक्त अजय पाटणे यांची भेट घेतली.केला.लोकमतने येथील पाण्याचा प्रश्न सातत्याने मांडला असल्याचे गाढवे यांनी त्यांच्या निदर्शनास आणले.
काय आहेत मागण्या?
बंगाली कंपाऊंड विभागातील कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवा, पाणी सोडण्याच्या वेळेत केलेली कपात रद्द करून पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरू करावा.कन्यापाडा परिसरात नळजोडणीसाठी दलालांच्या मार्फत मागण्यात येणाऱ्या पैशांची चौकशी करण्यात यावी.प्रभागातील विकासकांना पाणीपुरवठा कसा होत आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी.आरे कॉलनी मधील युनिट ३२ मधील पंप चालु करून ३१ व ३२ मधील नागरिकांना त्या टाकीवरून पाणी चालू करण्यात यावे .तसेच युनिट ७ मधील नागरिकांना योग्य दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी .साईबाबा कॉम्प्लेक्स मधील साई सदन इमारती मध्ये झालेल्या पाण्याचा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात माजी नगरसेविका सुगंधा शेट्टी, समाजसेवक दिपक परब, निलाक्षी भाबळ, विनायक ताटे, स्वाती शिर्के, सचिन सावंत, सुभाष जाधव, शिवा, गणेश घडशी, विजय मांजळकर , कुबेर लाड, कुप्पास्वामी, शांताराम सावंत, काशिनाथ गोलतकर, विरेंद्र सोनावने, समीर गुरव,वर्षा पवार, संध्या भेंडे, रुपाली सकपाळ, उमा कोळी, शिला पाटील, हिरा शृंगारे, विजय शर्मा , ललित पांडे, हरीश कांबळे तसेच साईबाबा कॉम्प्लेक्स, बंगाली कंपाऊंड, गोकुळधाम, कन्यापाडा, रामनगर, धीरज व्हॅली, सेटेलाइट, बंजारी पाडा, युनिट ३१, ३२, आणि आरे कॉलनी येथील नागरिक तसेच समस्त उद्धव सेनेचे शिवसैनिक, युवासेनिक, युवतीसेना, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख महिला व पुरुष उपस्थित होते.