कोकणात 'या'ठिकाणी उद्धवसेना-भाजप छुपी युती?, शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:53 IST2026-01-23T16:52:20+5:302026-01-23T16:53:04+5:30
छुप्या युतीचे आरोप, स्वबळाची थेट लढाई आणि उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा त्रिकोणी संघर्ष

कोकणात 'या'ठिकाणी उद्धवसेना-भाजप छुपी युती?, शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा
दापाेली : एकीकडे राज्यात उद्धसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला पोहोचलेला असताना, दापोली तालुक्यात मात्र, छुप्या युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोलीतील राजकारणाला अचानक वेगळीच कलाटणी मिळाल्याची चर्चा सुरु आहे.
दापोली तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवार उभे करण्याची पद्धत पाहता उद्धवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात अघोषित अथवा छुपी युती झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हर्णै व पालगड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने उमेदवार दिले आहेत. केळशी व कोळबांद्रे या दोन गटांत उद्धवसेनेने उमेदवार उभे केले आहेत, तर जालगाव व दाभोळ येथे भाजपने थेट लढत दिली आहे. या विभागणीमुळे ही लढत एकमेकांविरुद्ध नसून एकमेकांसाठीच आहे का? असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदेसेना मात्र पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. भाजपशी काडीमोड घेत शिंदेसेनेने स्वबळाचा नारा देत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच गटांत उमेदवार उभे केले आहेत. राज्यमंत्री योगेश कदम यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणुकीत चुरस
छुप्या युतीचे आरोप, स्वबळाची थेट लढाई आणि उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा त्रिकोणी संघर्ष तालुक्यात उभा राहिला आहे. त्यामुळे दापोलीतील ही निवडणूक सर्वात चुरशीची व लक्षवेधी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
उद्धवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद
दापाेली : तालुक्यातील कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातून उद्धवसेनेचे उमेदवार कमलाकर आंग्रे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे. त्यामुळे उद्धवसेनेला माेठा धक्का बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत गुरुवारी अर्जांची छाननी करण्यात आली.
कोळबांद्रे गटातून कमलाकर आंग्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापूर्वी त्यांनी पोलिस पाटील पदाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, अर्ज छाननीदरम्यान तांत्रिक कारणांवरून हा अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. या निर्णयामुळे कोळबांद्रे गटातील निवडणूक जवळपास एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप
दरम्यान, उद्धवसेनेने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन हा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ही कारवाई लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारी असून, याबाबत उच्च पातळीवर दाद मागण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.