Crime: "तो माझ्या मुलांना मारायचा" कर्जतमध्ये शेजारणीने अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 09:41 IST2025-11-16T09:37:54+5:302025-11-16T09:41:39+5:30
Karjat Murder: कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना घडली.

Crime: "तो माझ्या मुलांना मारायचा" कर्जतमध्ये शेजारणीने अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं!
कांता हाबळे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी या वस्तीमध्ये शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना घडली. शेजाऱ्यांच्या क्षुल्लक वादातून थेट अडीच वर्षांच्या निरागस चिमुकल्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. शेजाऱ्याची मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला मारले, अशी धक्कादायक कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिने पोलिसांसमोर दिली आहे.
जयदीप गणेश वाघ असे मृत चिमुकल्याचे नाव असून, त्याच्या मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र नेरळ पोलिसांनी खुन्याचा पर्दाफाश केला. नेरळ पोलिसांनी जयवंताला अटक केली असून, दि. १७ नोव्हेंबरपर्यंत तिला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. फिर्यादी गणेश वाघ व पत्नी पुष्पा हे दोघे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मजुरीसाठी गेले होते. त्यांची मुले घरासमोर खेळत होती. याचवेळी शेजारी राहणाऱ्या जयवंता मुकणे हिने जयदीपला उचलून पाठीमागील पायवाटेजवळ नेले आणि गळा आवळून त्याला ठार केले.
यानंतर तिने मुलगा बेशुद्ध झाल्याचे नाटक करत हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण केला. मुलाला त्याच्या आईने कळंब रुग्णालयात नेले होते, परंतु त्याला उपस्थित डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबाने परंपरेनुसार त्याचे अंत्यसंस्कारही करून टाकले.