फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:58 IST2025-10-29T19:57:32+5:302025-10-29T19:58:01+5:30
माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी त्या कुटुंबाने केली. महाराष्ट्र पोलिसांवर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं.

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
मुंबई - सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर राजकीय वादंग निर्माण झाले आहे. या मृत्यूमागे सत्ताधारी भाजपाचे माजी खासदार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबुब शेख यांनी काही पत्र दाखवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मेहबुब शेख म्हणाले की, मी जे बोलतोय, ती वस्तूस्थिती मांडली आहे. मुख्यमंत्र्यांना सगळ्या गोष्टी अवगत आहे. ते का या गोष्टीवर पडदा टाकतायेत कळत नाही. ज्याने या गोष्टीत फिर्याद केली, त्याने मला अर्ज पाठवला आहे. या मुलीची आत्महत्या संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे. फिर्यादीने पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय, २३ ऑक्टोबरला आम्ही बीडहून फलटणसाठी रवाना झालो. २४ ऑक्टोबरला तिथे पोहचलो. आम्हाला उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. हॉटेलमधून मृतदेह कधी आणला याची कल्पनाही आम्हाला देण्यात आली नाही असा त्यांचा आरोप आहे. लटकलेल्या अवस्थेत मृतदेह असताना एखादा रक्ताचा नातेवाईक तिथे पंचनामा करताना हजर पाहिजे. कुटुंबाला न विचारताच मृतदेह हॉटेलमधून हलवण्यात आला. हॉटेल कुणाचे आहे हे अख्ख्या फलटणला माहिती आहे. यात पोलीस काय लपवतायेत असा सवाल त्यांनी केला.
तसेच पहाटे ३ वाजता नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले. डॉक्टर धुमाळ यांना वारंवार फोन करून ते ५ वाजता तिथे आले. पोस्टमोर्टम फॉरेन्सिक एक्सपर्टद्वारे इन कॅमेरा करायचे होते. मात्र इथं ती सुविधा उपलब्ध नाही तुम्ही साताऱ्यात जा असं धुमाळ यांनी सांगितले. सकाळी १० वाजता मृतदेह साताऱ्याला नेला. आरोपीचा बचाव करण्यासाठी पोलिसांनी दुपारी २ पर्यंत FIR दाखल केला नव्हता. पीडित मुलीचा भाऊ डॉक्टर तो पोस्टमोर्टमला हजर राहायला तयार होता, परंतु त्याला परवानगी दिली नाही. एका राजकीय गिधाडाला पाठीशी घालण्यासाठी काय चाललंय. पीडित कुटुंबाने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी त्या कुटुंबाने केली. महाराष्ट्र पोलिसांवर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं.
दरम्यान, ज्यानं भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढली, त्या आगवणे कुटुंबाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दहशतीचे आरोप केले आहे. त्यांच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. राज्यात कायदा आहे का असा प्रश्न निर्माण होतो. देवेंद्र फडणवीस न्यायाधीशांच्या खुर्चीत जाऊन बसतायेत, गृहमंत्री म्हणून क्लीनचीट देत असाल तर दुर्दैवी आहे. ननावरे नावाच्या कुटुंबाने रणजितसिंह निंबाळकरांमुळे आत्महत्या केली. मात्र पोलिसांना पुरावे मिळत नाही असा आरोप कुटुंब करत आहेत. या प्रकरणाचा काहीच तपास झाला नाही. महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या स्तराला नेऊन ठेवलंय असा आरोप शेख यांनी भाजपावर केला.