अलमट्टीतून होणाऱ्या विसर्गावर पूरस्थिती अवलंबून : डॉ. दीपक म्हैसेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 11:12 AM2019-08-09T11:12:48+5:302019-08-09T11:24:32+5:30

अतिवृष्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने साडेचार लाख क्युसेक पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक सरकारकडे केली आहे.

Turbulence of floods Depending on the almatti dam water left percentage : Deepak Mhaisekar | अलमट्टीतून होणाऱ्या विसर्गावर पूरस्थिती अवलंबून : डॉ. दीपक म्हैसेकर 

अलमट्टीतून होणाऱ्या विसर्गावर पूरस्थिती अवलंबून : डॉ. दीपक म्हैसेकर 

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील पूर पातळीत नऊ इंचाने वाढकोल्हापुरातील पूर पातळीत अकरा इंचाने घट

पुणे : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग अजूनही पाण्याखालीच आहे. सांगली जिल्ह्यातील पूर पातळीत नऊ इंचाने वाढ झाली आहे. कोल्हापुरातील पूर पातळीत अकरा इंचाने घट झाली असली तरी बराचसा भाग पाण्याने वेढलेला आहे. अलमट्टी धरणातील विसर्ग वाढत नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. येथील पूरस्थिती अलमट्टीतून होणारा विसर्ग आणि पावसाचा जोर कसा असेल यावर अवलंबून असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 
पुणे विभागातील पूर स्थिती आणि बचाव कार्याच्या कामाचा आढावा विभागीय आयुक्तांनी गुरुवारी घेतला. सहकार व मदत पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली गेला आहे. गुरुवारी देखील तशीच स्थिती होती. पुणे बेंगळुरु मार्ग अजूनही बंद असून, बेळगावी कडून कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सांगलीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गाची देखील तीच स्थिती आहे. पुण्याकडून बेंगळुरुकडे जाणाºया रस्त्यावर किणी आणि शिरोली जवळ पाणीपातळी कमी होत आहे. पाऊस न झाल्यास शुक्रवारी हा रस्ता सुरु करण्याबाबत निर्णय घेता येईल. मात्र, बेळगावीकडून कोल्हापूरकडे येणाºया रस्त्यावर शुक्रवारी देखील पाण्याचा निचरा शक्य नसल्याने हा मार्ग सुरु होणार नसल्याचे विभागीय आयुक्त म्हैसेकर म्हणाले. 


गुरुवारी सकाळी कोल्हापूरातील राजाराम बंधारा येथे पूर पातळी ५४.१० फूटांवर होती. त्यात दुपारी २ वाजेपर्यंत ५३.११ फूटापर्यंत घट झाली. म्हणजे ११ इंचाने पाणी पातळी कमी झाली आहे. येथे हळू हळू पाणी कमी होत आहे. मात्र, सांगलीतील पूराची पातळी ५६.८ फूटांवरुन ५७.५ फूटापर्यंत वाढली आहे. अजूनही येथील पाणीपातळी कमी होताना दिसत नाही. 
सुदैवाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा तुलनेने जोर कमी आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग २५ हजारांवरुन ६९ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून अपेक्षित विसर्ग होत नसल्याने आणि कोयनेतून सोडण्यात येणारे पाणी जमा होत असल्याने सांगलीतील पुराच्या पातळीत वाढ झाली असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले. 
...........
अलमट्टी धरणामधे ३.३६ लाख क्युसेक पाणी जमा होत असून, ३ लाख ५५ हजार ३४० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. महाराष्ट्राने साडेचार लाख क्युसेक पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक सरकारकडे केली आहे. मात्र, उत्तर कर्नाटकात देखील पूरस्थिती असल्याने अजून विसर्ग वाढविण्यात आलेला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधल्यानंतर कर्नाटक सरकारने विसर्ग वाढविण्याचे आदेश अलमट्टी धरण प्रमुखांना दिले आहेत. मात्र, सध्याच्या विसर्गात नक्की किती वाढ होईल हे सांगता येत नाही. वाढ होईल, असे सांगण्यात आले. 
डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त पुणे


......
सांगली दुर्घटनेतील ९ जणांचे मृतदेह हाती

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथून खटावच्या दिशेने जाताना बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मरण पावलेल्या ९ व्यक्तींचे मृतदेह हाती आले आहेत. त्यात सात महिला एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर, १९ जण पोहून किनाºयावर आले. अजूनही चार ते पाच जण बेपत्ता आहेत. लहानमुलाची ओळख पटू शकली नाही. पप्पूताई भाऊसाहेब पाटील, राजमती जयपाल चौगुले, नंदा तानाजी गडदे, कल्पना रवींद्र कारंडे, कस्तूरी बाळासाहेब वडर, बाबासाहेब अप्पासाहेब पाटील वडर, लक्ष्मी जयपाल वडर, मनीषा दीपक पाटील अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीच्या बोटीतून या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत होते. त्यावेळी ही दुर्घटना झाली. या बोटीमधे ३० ते ३५ जण होते. 
------------------------
पुणे विभागातील मृतांची संख्या

सांगली    ११
कोल्हापूर     २
सातारा    ७
पुणे        ६
सोलापूर    १
------------------
पुणे जिल्ह्यात झालेले मृत्यू
मावळ तालुक्यात घरावरचे छत पडून कुणाल अजय दोडके, जयप्रकाश नायडू यांचा मृत्यू झाला. तर, श्रीराम दर्ज सोहू यांचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. जुन्नरमधे ढिगाºयाखाली गेल्याने नजमा सलीम शेख यांचा तर, पाय घसरुन नदीत पडल्याने पुरंदर तालुक्यातील कौशल्या चंद्रकांत यांना प्राण गमवावे लागले. दौंडमधे कबाल बाबू खान पुरामधे वाहून गेले. 
---------------------
बाटलीबंद पाणी आणि धान्य देणार

पूर स्थिती ओसरु लागल्यानंतर नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. नागरिकांना प्रसंगी बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी सूचना कोल्हापूर जिल्हाधिकाºयांना देण्यात आली आहे. तसेच, कोलमडलेली पाणीपुरवठा यंत्रणा युद्धपातळीवर सुरु करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे. या शिवाय नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार नाही, याची दक्षता जिल्हा अन्न धान्य पुरवठा विभागाने घ्यावी अशी सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे. बाधितांना प्रति कुटूंब १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. 
---------------
- कोल्हापूरात ७ एनडीआरएफ पथक, १४ नेव्ही, ४ टेरिटोरिअल आर्मी, जिल्हा प्रशसनाची २१ आणि इतर मिळून ४८ पथके आणि ६३ बोटी 
- सांगलीत ८ एनडीआरएफ पथके, १ टेरिटोरिअल आर्मी, ५ नेव्ही आणि ११ जिल्हा पथके, १ कोस्टगार्ड पथक आणि ४१ बोटी कार्यरत. 
- सांगलीमधे पुण्याहून ३ एनडीआरएफ पथके १३ बोटींसह गुरुवारी रवाना. 
- साताºयात ८ पथके आणि १० बोटी कार्यरत

Web Title: Turbulence of floods Depending on the almatti dam water left percentage : Deepak Mhaisekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.