छत्रपती संभाजीनगर - नाशिक येथे जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ८०० कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर छत्रपती संभाजीनगर ते नाशिक कुंभमेळा मार्गादरम्यान उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध विभागांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी एकत्रित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व विभागांची एकत्रित बैठक लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तयारीला आला वेग : कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांची तयारी वेगाने सुरू झाली आहे. रस्ते विकास, नवे रस्ते व पूल बांधणी, वाहतूक नियोजन याचा यात समावेश आहे. शासनाने नाशिकला पहिल्या टप्प्यात ५ हजार कोटींचा निधी मंजूर केला. यात विविध कामांचा समावेश आहे. याच धर्तीवर वेरूळ घृष्णेश्वर मंदिर, नाशिककडे जाणाऱ्या मार्गांच्या विकासासाठी निधी मागण्यात येईल.
सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसंबंधी बैठक होईल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात, शहरात कुठल्या कामांचे प्राधान्य असावे, याचा आढावा घेऊन ८०० कोटी रुपये मिळावेत, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
कुंभमेळ्याच्या धर्तीवर संभाव्य कामे अशी....रस्ते विकास : जिल्ह्यातील अंतर्गत व बाह्य रस्ते, नवीन रस्ते व डागडुजीचा विचार केला जाईल.पोलिस कंट्रोल रूम : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंगची सुविधा केली जाईल. पोलिस कंट्रोल रूम असेल.एफडीएची लॅब : सुरक्षेच्या दृष्टीने अन्न व औषधी प्रशासनाची तात्पुरती लॅबदेखील कुंभमेळा मार्गावर तयार करण्यात आहे.निधीची तरतूद : आवश्यक कामांसाठी ८०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे.