शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:13 IST2025-11-09T07:13:01+5:302025-11-09T07:13:25+5:30
Parth Pawar News: मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाच्या खरेदीखताद्वारे विश्वासाचा अजब नमुना समोर आला आहे. कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांनी ३०० कोटींच्या जमिनीच्या व्यवहारापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राईजेसकडून एकही रुपया न घेता थेट खरेदीखत केले आहे.

शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
पुणे - मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाच्या खरेदीखताद्वारे विश्वासाचा अजब नमुना समोर आला आहे. कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांनी ३०० कोटींच्या जमिनीच्या व्यवहारापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राईजेसकडून एकही रुपया न घेता थेट खरेदीखत केले आहे. ही तीनशे कोटींची रक्कम कशी व केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख या खरेदीखतात केलेला नाही, हे विशेष.
सामान्यांच्या खरेदीखतावेळी मात्र किती पैसे दिले, कसे देणार आहात, खरेदीखतापूर्वी साठेखत करूया, त्यानंतर पूर्ण रक्कम मिळाली की खरेदीखत करू, अशा अनेक बाबींसाठी जमीन विक्रेता, वकील आणि दुय्यम निबंधकही आग्रही असतात. या व्यवहारात मात्र असा कोणताही 'अर्थपूर्ण' आग्रह धरण्यात आलेला नाही. किती पैसे दिले, कसे देणार आहात, खरेदीखतापूर्वी साठेखत करूया,
त्यानंतर पूर्ण रक्कम मिळाली की खरेदीखत करू, अशा अनेक बाबींसाठी जमीन विक्रेता, वकील आणि दुय्यम निबंधकही आग्रही असतात. या व्यवहारात मात्र असा कोणताही 'अर्थपूर्ण' आग्रह धरण्यात आलेला नाही.
'वास्तव चित्र समोर आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच!'
अकोला :
पुण्यातील जमीन खरेदी घोटाळा गंभीर प्रकरण असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यास, त्यांनी चौकशी करून त्या संदर्भातील वास्तव चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या घोटाळा प्रकरणात पवारांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यावर शरद पवारांनी प्रथमच भाष्य केले.
पार्थ पवार असे काही करतील, असे आपल्याला वाटत नसल्याची प्रतिक्रिया खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते त्यावर विचारले असता, ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते, असे शरद पवार म्हणाले. प्रशासन, राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या बाबी आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
सरकार पार्थ पवार यांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, चौकशी समितीतून स्थापन केली असून, त्यातून काय समोर येते ते पाहू. अमेडिया कंपनीत पार्थ यांची ९९ टक्के व, त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांची केवळ एक टक्के भागीदारी असताना, पार्थ यांच्यावर मात्र गुन्हा का दाखल केला नाही असे विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर राज्याचे गृहमंत्रीच देऊ शकतात असे पवार म्हणाले.
'पुणे जमीन प्रकरणात कोणाला वाचविण्याचा प्रश्नच नाही!'
गडचिरोली : खरेदी व्यवहारात ज्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या, त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. यात कोणाला वाचवण्याचा प्रश्नच नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते गडचिरोली दौऱ्यावर होते. सिरोंचात पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांनी केलेल्या प्रश्नाबद्दल विचारले असता, फडणवीस म्हणाले, खरेदीदार कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकर्ते आणि ज्यांनी व्यवहारास परवानगी दिली, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. सरकार कोणालाही वाचविण्याच्या भूमिकेत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आतापर्यंत सरकारने केलेली कार्यवाही ही पूर्णपणे कायद्यानुसार आहे. तपास सुरू असून, कोणाचाही सहभाग आढळल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कोणाला वाचविण्याचा प्रश्न येतो कोठे? असा प्रतिसवाल त्यांनी केला.
शीतल तेजवानीचे विदेशात पलायन ?
पुणे : जमीन गैरव्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शीतल किसनचंद तेजवानी यांनी विदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. तेजवानी यांच्या विरुद्ध बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. नुकताच खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पिंपरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते 'एसआयटी'चे प्रमुख
पिंपरी : जमीन व्यवहारप्रकरणाच्या सखोल तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्थापन केलेल्या 'एसआयटी'चे प्रमुख म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते काम पाहतील. 'एसआयटी'त ८ अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. मुंढवा येथील जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणी शीतल किशनचंद तेजवाणी, अमिडीया कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि निलंबित सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपासही 'एसआयटी'चे प्रमुख बावधन पोलिस ठाण्याचे अनिल विभुते यांच्याकडे आहे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता.