Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:35 IST2025-11-17T13:27:42+5:302025-11-17T13:35:25+5:30
Ganpatipule Drown: समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने भिवंडीतील तीन तरुण बुडाल्याची घटना घडली, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जणांना वाचवण्यात यश आले.

Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
लोकमत न्यूज नेटवर्क
गणपतीपुळे : समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने भिवंडीतील तीन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून, एकाचा बुडून मृत्यू झाला. अमोल गोविंद ठाकरे (वय २५, भिवंडी) असे मृत तरुणाचे नाव असून, पर्यटक निवासासमोरील समुद्रकिनारी रविवारी पहाटे त्याचा मृतदेह सापडला.
भिवंडी येथून सहा मित्र गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी शनिवारी आले होते. त्यापैकी अमोल ठाकरे, विकास विजयपाल शर्मा (वय २४), मंदार दीपक पाटील (वय २४) हे तिघे समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. तिघांनीही समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. हा प्रकार त्यांच्यासोबत किनाऱ्यावर असलेल्या अन्य मित्रांनी पाहिला आणि त्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी धावा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून मोरया वॉटर स्पोर्टच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तत्काळ धाव घेत मदत केली. यातील दोघांना पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, अमाेल हा खोल समुद्रात बेपत्ता झाला होता.
पाेलिसांच्या गस्तीत वाढ
गणपतीपुळे येथे शनिवार, रविवारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, यातील अतिउत्साही पर्यटक खोल समुद्रात पोहण्याची जोखीम घेत आहेत. मात्र, पाण्याचा अंदाज येत नसल्याने पर्यटक बुडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली.