येत्या काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका; राष्ट्रवादी नेत्याचा 'आश्चर्य नको' असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 05:09 PM2023-07-13T17:09:19+5:302023-07-13T17:09:45+5:30

शिवसेना शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अनेक आमदार सांगत आहेत की मी मंत्री होणार आहे, मी पालकमंत्री होणार आहे.  - खडसे

Threat to Eknath Shinde's post as Chief Minister in the coming time; NCP Leader Eknath Khadse leader's 'surprising' claim | येत्या काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका; राष्ट्रवादी नेत्याचा 'आश्चर्य नको' असा दावा

येत्या काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका; राष्ट्रवादी नेत्याचा 'आश्चर्य नको' असा दावा

googlenewsNext

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप झालेले नाहीय. अजित पवारांना अर्थखाते देण्याचे निश्चित नाही, तो एक अंदाज आहे. गेल्यावेळी यावरूनच शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये तक्रारी होत्या. यामुळे पुन्हा पवारांना तेच खाते दिले जाईल म्हणून आमदारांत नाराजी आहे, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.  

या आमदारांना वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य करावा लागणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अनेक आमदार सांगत आहेत की मी मंत्री होणार आहे, मी पालकमंत्री होणार आहे.  काहीजण म्हणत आहेत मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, माझा शपथविधी ठरलेला आहे. प्रत्येकाला मंत्रीपद हवे आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवरून मंत्रिमंडळ विस्ताराने खाते वाटप नंतर नाराजी ही उफाळून येणार आहे, असा दावा खडसे यांनी केला आहे. 

भाजपच्याही आमदारांमध्ये नाराजी आहे. मात्र, ते त्यांच्यातील नाराजी बाहेर बोलत नाहीएत. बाकीचे जसे उघडपणे बोलतात, तसे त्यांना करता येत नाहीय. भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपमधील अनेक आमदार माझ्याशी बोलताना नाराजी व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या निर्णयाविरोधात ते नाखुश असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आज उद्या या परिस्थितीचा परिणाम जो दिसेल तो या तिघा पक्षांसाठी अनुकूल असेल असं वाटत नाही, असे खडले म्हणाले. 

भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही मात्र सध्या राज्यात जो घाणेरडा प्रकार सुरू आहे. जे किळसवाणे राजकारण सुरू आहे ते यापूर्वी महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही. - कर्नाटकच्या निवडणुका जिंकल्यामुळे काँग्रेस मधून कोणी जाईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. कर्नाटकचे विजयामुळे उलट काँग्रेसच्या आमदारांमध्ये उत्साह आहे. काही महिन्यांसाठी काही दिवसांसाठी काँग्रेसमधून कोणी तिकडे जाईल असं मला वाटत नाही. पक्ष फोडणे हेच प्रथम कर्तव्य देवेंद्र फडणवीस यांचे दिसत आहे. स्वतःच्या पक्षावर लक्ष देण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस यांनी अधिक लक्ष दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला धोका आहे. एखादवेळेस शिंदे हे अपात्र झाल्यास त्यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे खडसे यांनी सांगितले.

Web Title: Threat to Eknath Shinde's post as Chief Minister in the coming time; NCP Leader Eknath Khadse leader's 'surprising' claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.