प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 05:54 AM2024-05-26T05:54:16+5:302024-05-26T05:55:18+5:30

सहावा टप्पा संपताच देशातील २५ राज्यांतील ४२८ मतदारसंघांतील निवडणूक आटोपली आहे. उर्वरित ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होईल.

Lok Sabha Election 2024 West Bengal lead remains Highest turnout of 79.35% In the sixth phase the total polling was 61.04 percent | प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान

प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत देशात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. प्रत्येकवेळी हिंसाचाराच्या घटना घडणाऱ्या बंगालमध्ये मतदान मात्र भरभरून झाले. शनिवारी आठ राज्यांतील ५८ मतदारसंघांत रात्री ११ वाजेच्या आकडेवारीनुसार ६१.०४ टक्के मतदान झाले. त्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९.३५ टक्के, तर सर्वांत कमी ५४.०३ टक्के मतदान उत्तर प्रदेशमध्ये झाले. पहिल्या तीन टप्प्यांचा अपवाद वगळता बंगालमध्ये चौथ्या टप्प्यापासून सर्वाधिक मतदान होत आहे. 

सहाव्या टप्प्यात सर्वाधिक लक्ष लागले होते ते दिल्लीतील मतदानाकडे. प्रखर उन्हाला न जुमानता दिल्लीत  ७ जागांसाठी मतदान झाले. दरम्यान, सहावा टप्पा संपताच देशातील २५ राज्यांतील ४२८ मतदारसंघांतील निवडणूक आटोपली आहे. उर्वरित ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होईल.

राजधानी दिल्लीत ५७.६७%

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७%, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३% मतदान झाले.

अनंतनाग-राजौरीत ५४.१५%

तिसऱ्या टप्प्यात होणारे मतदान प्रतिकूल हवामानामुळे सहा टप्प्यात मतदान झालेल्या जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरीमध्ये किरकोळ वादावादी वगळता ५४.१५ टक्के मतदान झाले. अनंतनागमध्ये प्रशासनाकडून पीडीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पक्षाच्या नेत्या मुफ्ती मोहम्मद यांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. 

ओडिशात विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात  सरासरी ७०.०४ टक्के मतदान झाले. पोटनिवडणूक झालेल्या हरयाणाच्या कर्नालमध्ये ५७ टक्के, तर उत्तर प्रदेशच्या घैनसारीत ५१.१० टक्के मतदानाची नोंद झाली.

तापमानाचा मतदानावर परिणाम

सहाव्या टप्प्यात मतदान होत असलेल्या बहुतांश राज्यांत हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अंदाज दिला होता. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदार सावलीचा आधार शोधत होते. काहींनी तर सोबत छत्री, दुपट्टाही आणला होता. मतदारांच्या सोयीसाठी केंद्रांवर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे तसेच कुलरची व्यवस्था केली होती. त्यामुळे दुपारच्या वेळी गर्दी ओसरली होती.

राज्यनिहाय मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले आहे. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झालं आहे. तर पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी आज मतदान पूर्ण झाले. हरियाणामध्ये ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. तर राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झालं. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झालं. तर ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढं मतदान झालं आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024 West Bengal lead remains Highest turnout of 79.35% In the sixth phase the total polling was 61.04 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.