लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:41 IST2025-08-18T16:39:43+5:302025-08-18T16:41:58+5:30
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.

लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
महाराष्ट्रामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी सून' या अभियानाची सुरुवात केली. या अभियांतर्गत राज्यातील पीडित महिलांची मदत केली जाईल, यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
नुकतेच एकनाथ शिंदेंनी 'लाडकी सून' अभियानासंदर्भात त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून माहिती दिली. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात आता इथून पुढे आमच्या लेकी-सुनांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कारण महाराष्ट्राच्या लेकी-सुना सुरक्षित, तर महाराष्ट्रही सुरक्षित राहील. प्रत्येक घरातली सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या बहिणींचा आणि सुनांचा छळ करणारी वृत्ती ही समाजासाठी कलंक आहे. अशी वृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. त्यांना अद्दल घडवली पाहिजे. त्यामुळे सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल."
लाडक्या सुनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन !
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 18, 2025
महाराष्ट्रात आता इथून पुढे आमच्या लेकी-सुनांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कारण महाराष्ट्राच्या लेकी-सुना सुरक्षित, तर महाराष्ट्रही सुरक्षित राहील. प्रत्येक घरातली सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या…
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यातील महिलांच्या संरक्षणासाठी 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन' हे अभियान आपण हाती घेत आहोत. यापुढे शिवसेनेच्या शाखा हे या लाडक्या सुनांचे हक्काचे माहेर असेल, हे साऱ्यांनीच लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींनी, लाडक्या सुनांनी इथून पुढे कोणत्याची दबावाला बळी पडू नये. तुमच्यावरचा दबाव झुगारून टाका. लाडक्या सुनांच्या मदतीसाठी शिवसेनेने एक हेल्पलाइन सुरू केली आहे."
महिलांच्या मदतीसाठी शिंदे गटाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला. पीडित महिला मदतीसाठी ८८२८८६२२८८ / ८८२८८९२२८८ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकतात. "तुमच्या एका फोननंतर शिवसेनेच्या रणरागिणी तुमच्या मदतीला नक्की येतील. कायदेशीर मदत लागली, तर तीही या अभियानाच्या माध्यमातून दिली जाईल. छळ करणाऱ्यांना आधी समजावून सांगितलं जाईल. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर मग काय करायचं, ते आमच्या शिवसेनेच्या रणरागिणींना चांगले माहीत आहे", असेही शिंदे म्हणाले.
नारी शक्ति है, सम्मान है,
नारी गौरव है, अभिमान है,
नारी ने ही ये रचा विधान है,
नतमस्तक इसको प्रणाम है,
नारी के सम्मान के खातिर
एक कदम हमने बढ़ाया है
या नारीशक्तीला वंदन करून आज आपल्या सुना सुरक्षित राहतील हा संकल्प करू या. तसेच, 'लाडक्या सुनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन !' हे अभियान यशस्वी करूयात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.