आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:56 AM2023-11-25T11:56:00+5:302023-11-25T11:57:01+5:30

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण ताकदीने पाठपुरावा करतोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Those asking for reservation do not even mention the name of Dr. Babasaheb Ambedkar; Gopichand Padalkar Target Manoj Jarange Patil | आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे?

आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे?

जालना - आम्ही आरक्षणाची लढाई रस्त्यावरही लढतोय, न्यायालयातही लढतोय आणि सरकारकडेही पाठपुरावा करतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आम्हाला आरक्षण आहे. म्हणून या महाराष्ट्रात आणि देशात धनगरांचा एकच साहेब आहे ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. काही पुरोगामी  नेत्यांनी महाराष्ट्रात जातीयवादी पिल्लावळ तयार केल्यात. आरक्षण मागतायेत पण ते डॉ. बाबासाहेबांचा सन्मान करायला तयार नाहीत, नावही घेत नाहीत पण त्यांना आरक्षण पाहिजे अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. 

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, बाबासाहेबांचे नाव आम्ही घेणार नाही हे कसं चालेल, आम्ही बाबासाहेबांमुळे आहोत, संविधानाने धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. ७० वर्ष इतका मोठा अन्याय आमच्यावर केला. आमचे आयएएस, आयपीएस किती झाले असते, आमचे आमदार खासदार किती झाले असते पण या सगळ्यापासून आम्ही मुकलो. पण आता ती वेळ आलेली आहे. मागे ७० वर्षात जे झालंय ते आता आम्ही होऊ देणार नाही. आम्ही सगळे एकत्रित आलोय, एकजूट आणि संघटित झालोय आणि राज्यातील धनगरांच्या पोरांच्या हातात एसटीचा दाखला द्या याला दुसरा कुठलाच पर्याय नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आपल्याला केवळ न्यायालयीन लढाईवर अवलंबून नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. रस्त्यावरची लढाई लढतोय. राज्य सरकारसमोर आपण एक पर्याय ठेवलाय. राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात एक जीआर काढावा की या राज्यात धनगड अस्तित्वात नाही. मग प्रत्येक धनगरांच्या पोरांना एसटीचा दाखला द्या. बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश राज्य सरकारचे जीआर आम्ही सरकारसमोर ठेवले. असा जीआर सरकारने काढावा अशी मागणी आम्ही केलीय. आता सरकारने समिती नेमली त्या समितीने जीआर काढलेल्या राज्यात जायचे आणि कुठल्या अधिकारात जीआर काढला एवढीच माहिती द्यायची आहे. धनगर अधिकारी, समाजाचे सहशासकीय सदस्य हे त्यावर अभ्यास करणार आहेत असं गोपीचंद पडळकरांनी सांगितले. 

दरम्यान, जालनात धनगर समाजाला डिवचून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण ताकदीने पाठपुरावा करतोय. सरकारने या वर्षी धनगर समाजच्या आरक्षणाबाबतीत भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात ३० बैठका देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाल्या. महाविकास आघाडी काळात एकही बैठक झाली नाही. आपल्या बाजूने दोन प्रतिज्ञापत्र सरकारने कोर्टात सादर केलीत. जे आपल्या बाजूने आहे त्यांचे कौतुक केले पाहिजे. आपण कायदा मानणारे आहोत असंही पडळकर म्हणाले. 

Web Title: Those asking for reservation do not even mention the name of Dr. Babasaheb Ambedkar; Gopichand Padalkar Target Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.