'हा आहे सरकारचा नवा पॅटर्न'; जयकुमार गोरे प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे, देवकरांचाही उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:11 IST2025-03-26T18:09:29+5:302025-03-26T18:11:20+5:30

Jaykumar Gore Rohit Pawar: जयकुमार गोरे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत हा बदनामीचा कट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता रोहित पवारांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे.

'This is the government's new pattern'; Rohit Pawar's explosive claims in the Jayakumar Gore case, Deokar also mentioned | 'हा आहे सरकारचा नवा पॅटर्न'; जयकुमार गोरे प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे, देवकरांचाही उल्लेख

'हा आहे सरकारचा नवा पॅटर्न'; जयकुमार गोरे प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे, देवकरांचाही उल्लेख

Rohit Pawar Latest News: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले. त्या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. गोरे यांच्या बदनामीचा कट असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना याची माहिती असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात काही स्फोटक दावे केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा कट रचला. त्यात ही महिला आणि पत्रकार तुषार खरात होते. गोरेंच्या बदनामीचे व्हिडीओ तयार केल्यानंतर ते सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आणि प्रभाकरराव देशमुख यांना पाठवण्यात आले होते', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले होते. 

हेही वाचा >> जयकुमार गोरेंच्या बदनामीत सुप्रिया सुळे, रोहित पवारही; पुरावे आहेत, चौकशी करू-  मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या या माहितीनंतर सु्प्रिया सुळे यांनी त्यांची भूमिका मांडली. रोहित पवारांनीही विधानसभेत खुलासा केला. त्यानंतर आता रोहित पवारांनी एक दीर्घ पोस्ट लिहिली असून, त्यात काही दावे केले आहेत. 

जयकुमार गोरेंचं प्रकरण... रोहित पवारांची पोस्ट 

"एका भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी यंत्रणा कशी घरगड्यासारखी राबते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रकरण."

"हे प्रकरण समोर आणणारे पत्रकार तुषार खरातांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे नोंदवायचे, अटक करायची, एका गुन्ह्यात जामीन मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात अटक करायची, जेणेकरून पत्रकार एक दोन महिने आतच सडला पाहिजे आणि त्याचे मानसिक खच्चीकरण झाले पाहिजे, हा या सरकारचा कारभार आहे का?"

"ही नवी कार्यपद्धती आहे का?"

"पीडित महिलेच्या वकिलाला हाताशी धरून तिलाच खंडणीच्या गुन्हयात फसवायचे, एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळताच तिचे नाव दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून पोलीस कस्टडी घ्यायची, तिचा भावनिक आणि मानसिक छळ करायचा, ही सरकारची नवी कार्यपद्धती आहे का?"

"राजकीय नावे घेण्यासाठी आता तर पत्रकार आणि पीडित महिलेवर दबाव टाकला जात असून या दोघांना स्वतःच्या हस्ताक्षरात मंत्री सांगतील ती नावे लिहून देण्यासाठी मकोका लावण्याच्या धमक्या दिल्या जात आल्याची चर्चा आहे, ही आहे सरकारची कार्यपद्धती आणि नवा पॅटर्न."

"आम्ही सत्य बाहेर आणूच"

"विशेष म्हणजे तपास अधिकारी अरुण देवकर जो मंत्र्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आहे त्याच्याविरुद्ध पोलीस विभागाने पीटा कायद्यात (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा) गुन्हा दाखल करत अटकही केली होती. भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार अजून किती कुटाणे करणार? पोलिसांवर, यंत्रणेवर दबाव आणून काळे कारनामे लपवता येणार नाहीत. कितीही काथ्याकुट करा, आम्ही सत्य समोर आणूच!"

Web Title: 'This is the government's new pattern'; Rohit Pawar's explosive claims in the Jayakumar Gore case, Deokar also mentioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.