हा मोठ्या कटाचा भाग, राज्यातील एक विषारी मंत्री...; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:03 IST2025-03-18T13:00:53+5:302025-03-18T13:03:06+5:30

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

This is part of a big conspiracy Prakash Ambedkars serious allegation on state government and nitesh rane | हा मोठ्या कटाचा भाग, राज्यातील एक विषारी मंत्री...; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

हा मोठ्या कटाचा भाग, राज्यातील एक विषारी मंत्री...; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Nagpur Violence: छत्रपती संभाजीनगर इथं असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकीय वादाचे पडसाद नागपुरातील महाल परिसरात उमटले. या परिसरात सोमवारी दिवसभर तणावाचे वातावरण असतानाच सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही समाजकंटकांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले असून पोलिसांनी २० तरुणांना ताब्यात घेतलं. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला धार आली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज समाजात द्वेष पसरवण्याचं आणि विभाजन करण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरूनही लोक आणले जात आहे. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे," असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचं नाव न घेता केला आहे.

दरम्यान, नागपूरसह राज्यभरातील लोकांना माझं आवाहन आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता कायम ठेवा, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.


 
नेमकं काय घडलं?

नागपूर शहरात सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क, तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन पोलिसांचे कपडेदेखील फाटले. काही समाजकंटकांनी रस्त्यांवरील वाहनांना आग लावली. काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्क येथे अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले.

अग्निशामक दलावरही दगडफेक
या दगडफेकीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच आग विझविण्यासाठी दाखल झालेले जवान यांच्यावरही जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलक दगड, चाकू फेकून मारत आहेत, अशी प्रतिक्रिया आग विझवायला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. या घटनेत अनेक पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले आहेत.

Web Title: This is part of a big conspiracy Prakash Ambedkars serious allegation on state government and nitesh rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.