'५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या'; काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 20:26 IST2025-03-28T20:24:20+5:302025-03-28T20:26:09+5:30
Maharashtra Congress: नाना पटोलेंना बदलून टाकेन, असे शिंदे सांगायचे, असेही पवार म्हणाले. २ लाख रूपये पक्षनिधी आहे, त्याची रितसर पावतीदेखील असल्याचे पवार यांनी सांगितले.

'५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या'; काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावले
जळगाव :काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली असून, यावेळी तर राज्य सहप्रभारींच्या समोरच जिल्हा बैठकीत पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावून गेले. या गोंधळात बैठकही गुंडाळण्यात आली. अमळनेरमधून विधानसभा निवडणूक लढलेले पराभूत उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी केंद्राच्या प्रभारींवर ५ लाख रुपये घेतल्यासह दारूच्या बाटल्या मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. याचवेळी जिल्हाध्यक्षांनाही २ लाख रूपये दिले मात्र त्याची माझ्याकडे पावती आहे, असाही आरोप शिंदे यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जिल्हा काँग्रेसची बैठक महाराष्ट्राचे प्रभारी तथा सचिव बी. एम. संदीप यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये झाली. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा प्रभारी प्रतिभा शिंदे, शहराध्यक्ष श्याम तायडे, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, अविनाश भालेराव, भगतसिंग पाटील आदी उपस्थित होते. ही बैठक सुरू झाल्यानंतर काही जणांनी काँग्रेसचे सचिव संदीप यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली.
अनिल शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार
अमळनेर विधानसभेचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे पक्षाच्या वरिष्ठांनाही जुमानत नाही, ते घमेंडी आहेत. सहप्रभारींच्या उपस्थित आयोजित बैठकित प्रोटोकॉल भंग केला म्हणून अनिल शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याची माहिती कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी अविनाश भालेराव व भगतसिंग पाटील यांच्यावरही कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बैठकीचे आपण अध्यक्ष आहोत, कोणी बोलायचे हे आपण ठरवणार असल्याचे सांगत जो आपले ऐकणार नाही, त्यांना सभागृहाच्या बाहेर जावे लागेल, असे जाहीर केले.
त्यांच्या या बोलण्यावरून सुरू झालेला वाद हा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला. अनिल शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यावर विधानसभेच्या आपल्या उमेदवारीवेळी खूप त्रास दिलाचा आरोप केला.
पक्षाच्या निधीसाठी दोन लाख रुपये आपल्याकडून ३ घेतल्याचा गंभीर आरोप केला. या वाढलेल्या वादावर प्रदेश सहप्रभारी बी. एम. संदीप यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. यानंतर काही वेळात बैठक गुंडाळण्यात आली.
काँग्रेसचे दुर्देव... - शिंदे
जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाच्या निरीक्षकांवर अनिल शिंदे यांनी गंभीर आरोप केले. घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... असा हा प्रकार आहे. निवडणूक काळात प्रत्येक मतदारसंघात तीन निरीक्षक पाठवायलाच नको. ज्यांना जिल्ह्याची माहिती त्यांना निरीक्षक नेमायचे होते. नेते, कार्यकर्ते प्रचारात पैसे मागतात, हे काँग्रेसचे दुर्दैव आहे.
शिंदेंमुळे आघाडीची मानहानी - पवार
जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आरोप फेटाळून लावला आहे. मी ४० कोटी खर्च करेन, असे सांगून शिंदे यांनी पक्षाची दिशाभूल केली. शिंदेंमुळे पक्ष नामोहरम झाला. डिपॉझिट जप्त झाले. प्रदेशाध्यक्ष बदलले. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष बदलल्याशिवाय आपल्याला संधी मिळणार नाही, असे शिंदेंना वाटते. तीन उमेदवार होते, ते का आरोप करत नाहीत. नाना पटोलेंना बदलून टाकेन, असे शिंदे सांगायचे, असेही पवार म्हणाले.
भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर
२ लाख रूपये पक्षनिधी आहे, त्याची रितसर पावतीदेखील असल्याचे पवार यांनी सांगितले. अनिल शिंदे हे काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी नाहीत. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन आम्ही चूक केली आहे. त्यांच्या वागण्यामुळे त्यांना केवळ तेरा हजार मते मिळाली. खोटे-नाटे आरोप करताना विचार करायला पाहिजे. त्यांच्या आरोपांचं आपण खंडन करतो. ते पुढील काळात भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असल्याने ते मला आणि पक्षाला विविध आरोप करत बदनाम करण्याच्या प्रयत्नात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटले आहे.