'या' महिलांना मिळणार नाहीत 3 हजार; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 18:32 IST2024-09-02T18:32:08+5:302024-09-02T18:32:34+5:30
ladki bahin yojana Latest Update : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेतील महत्त्वाच्या बदलाबद्दल माहिती दिली आहे.

'या' महिलांना मिळणार नाहीत 3 हजार; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरात चर्चा सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टनंतरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आज दिली.
गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, १ सप्टेंबरनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये मिळणार नाही."
लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार?
"आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नाही. यापुढेही अर्ज करता येणार आहेत", असे त्या म्हणाल्या.
31 ऑगस्टपूर्वी अर्ज न केलेल्या महिलांना फटका
सरकारने १ जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेसाठी राज्यभरातून २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज आले. या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता सरकारने ऑगस्टमध्ये जमा केला. त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित ३ हजार रुपये मिळाले.
ज्या महिलांनी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज केले नाहीत, त्यांना मात्र ३००० रुपयांना मुकावे लागणार आहे. यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत.
सरकारने १७ ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात केली असून, आतापर्यंत दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने पैसे जमा झालेले नाही. आधार लिंक झाल्यानंतर पैसे जमा केले जाणार आहेत.