Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:44 IST2025-07-14T11:41:23+5:302025-07-14T11:44:33+5:30
Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट येथे शाईफेक करण्यात आली. यावरुन आता त्यांनी गंभीर आरोप केलाय.

Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
Pravin Gaikwad :संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट येथे शाईफेक करण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आता प्रवीण गायकवाड यांनीही या प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. 'मला संपवण्याचा कट सुरू असून याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे', असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला.
"पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी त्यांचा निषेध करणार नाही. माझ्या हत्येचा कट रचला होता.अन्यथा माझ्या जीवीतावर हल्ला झाला होता. या हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला.
"अचानक हा हल्ला झाला. हा हल्लाच होता. आपल्याला दाभोळकरांची हत्या, कलबुर्गी यांची हत्या माहित आहे. ही हत्या कधी झाली २०१४ ते २०१९ या काळात झाली. या काळात त्यांच्या विचारधारेला त्यांचा विरोध होता. संभाजी ब्रिगेडची विचारधारा ही राज्यघटनेला अभिप्रेत आहे. मला संपवण्याचा कट सुरू असल्याचा मला संशय आहे, असंही गायकवाड म्हणाले.
हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी
महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतीक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील गुंडगिरी थांबत नाहीय हे सत्य आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंड आणि माफियाचे असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय गायकवाड यांच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे आमदारच कायदा हातात घेवून सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करतात. पण पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत.