बदलाचा आग्रह नाही, पण शिंदे चालतील

By Admin | Updated: June 21, 2014 01:35 IST2014-06-21T01:35:47+5:302014-06-21T01:35:47+5:30

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याची मागणी आम्ही काँग्रेस नेतृत्वाकडे केलेली नाही. मुख्यमंत्र्यांना बदलायचे की ठेवायचे, हा अधिकार त्यांचा आहे.

There is no insistence on change, but Shinde will run | बदलाचा आग्रह नाही, पण शिंदे चालतील

बदलाचा आग्रह नाही, पण शिंदे चालतील

>मुंबई :  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याची मागणी आम्ही काँग्रेस नेतृत्वाकडे केलेली नाही. मुख्यमंत्र्यांना बदलायचे की ठेवायचे, हा अधिकार त्यांचा आहे. उद्या सुशीलकुमार शिंदे आले तरी आमची काही हरकत नसेल, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांनी कॉंग्रेसचे नेते ए.के. अॅण्थनी, अहमद पटेल यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर राज्यात सुरू झालेली मुख्यमंत्री बदलाची चर्चा यावर पवारांनी आज स्पष्टीकरण दिले. या चर्चेत अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठी आली होती. तसेच बदलासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी चाचपणी आणि विचारविनिमय सुरू केल्याची चर्चा काल दिवसभर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. याबाबत स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले, महाराष्ट्रासह आसाम आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा विचार काँग्रेसचे नेतृत्व करीत आहे.  पण मुख्यमंत्री चव्हाण यांना आमचा विरोध नाही. कॉंग्रेसने नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला तर ते आमच्याशी सल्लामसलत करतीलच, असेही पवार म्हणाले. 
मनसेच्या शिडात हवा !
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी विधानसभा निवडणुकीत सुधारेल, असा अंदाज पवार यांनी वर्तविला. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मनसे हा मतदारांसाठी सक्षम पर्याय नव्हता.  मात्र विधानसभेत वेगळे चित्र असेल असे सांगत पवार यांनी मनसेच्या शिडात हवा भरली. (विशेष प्रतिनिधी)
 
काँग्रेस श्रेष्ठींची पवारांना गळ
विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वात लढवावी, असा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे, पण राज्यात परतण्याची आपली इच्छा नाही, असे आपण त्यांना सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धूरा सांभाळण्याची आपली तयारी आहे, असे पवार म्हणाले. काँग्रेससोबत जागावाटपात काही अडचण येणार नाही. आम्हाला जागा वाढवून हव्या आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
 
राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना संघटनेत पाठविणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना पक्षसंघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत याबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना बदलले जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. पवार यांनी पक्षसंघटनेत बदल केले जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 
ते म्हणाले की मुख्यमंत्री बदलले किंवा न बदलले तरी राष्ट्रवादीने काही बदल करण्याचे ठरविले आहे. मंत्रिमंडळातून कोण वगळले जाणार, याबाबत पवार यांनी गुप्तता बाळगली, तरी सूत्रंनुसार जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते. गृहमंत्री आर. आर.पाटील यांचेही नाव विचाराधीन आहे. पवार यांनी आज दुपारी छगन भुजबळ व आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली.

Web Title: There is no insistence on change, but Shinde will run