"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:07 IST2026-01-12T14:06:19+5:302026-01-12T14:07:40+5:30
Raosabheb Danve : "मी एकटा पराभूत झालो, माझा पक्ष जिंकला. पण यांचा पक्ष हारला. हे तर जिंकलेच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकेला आम्ही काही महत्व देत नाहीत."

"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
रावसाहेब दानवे 'पडलेले खासदार', म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी, महापालिका निवडणुकीनिमित्त आयोजित छत्रपती संभाजीनगर येथील प्रचारसभेत दानवे यांच्यावर निशाणा साधला होता. आता यावरून दानवे यांनी 'वैफल्यग्रस्त' म्हणत, उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
"आता ते वैफल्यग्रस्त झाले आहेत..." -
दानवे म्हणाले, "रावसाहेब दानवेचा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक आहे. आता ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुणावरही तोंडसूख घेत आहेत. आणि असे काही तरी 'व्यक्तिशः' कुणावर बोलल्याशिवाय, यांच्यासभेला पूर्वीप्रमाणे टाळ्याही वाजत नाहीत आता. यामुळे अशा प्रकारचे आरोप ते करतात. पण, मी पराभूत झालो, मी एकटा पराभूत झालो, माझा पक्ष जिंकला. पण यांचा पक्ष हारला. हे तर जिंकलेच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकेला आम्ही काही महत्व देत नाहीत." ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -
"मी आजच्या मुंबईतल्या पेपरचं कटिंग आणलंय. यात आपले रावसाहेब दानवे 'पडलेले खासदार', म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत. त्यांचं एक वक्तव्य आहे. ते म्हणाले आहेत की, 'त्यांच्या ताटात सगळे पक्ष जेवून गेलेत.' अहो दानवे साहेब, हे जर का खरं असेल तर, आता तुम्ही आमच्या पाण्यातलं उष्ट खरकटं का खाताय? सगळ्यांच्या पाण्यातलं का खावं लागतंय तुम्हाला? स्वतःच्या ताकतीवरती अजून तुमचं पोट का नाही भरत? का अजुनही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय भस्म आरोप झालाय का की, किती खाल्लं तरी भूकच भागत नाही? किती खायचं?" अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावरन निशाणा साधला होता.