...मग अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करतील; संजय राऊतांचा भास्कर जाधवांवरही खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:32 IST2025-02-16T11:30:32+5:302025-02-16T11:32:05+5:30
कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. - संजय राऊत.

...मग अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करतील; संजय राऊतांचा भास्कर जाधवांवरही खुलासा
एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल, असे राऊत म्हणाले. तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील, असे आव्हान राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूड बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही, असेही ते म्हणाले.
कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला. मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला. परंतू मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत. ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते. राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे, त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये. लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना 18 हजाराचा मताधिक्य होते. राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले, असा सवाल राऊत यांनी केला.
राजन साळवी हे पक्षाचे जुने, आमचे कार्यकर्ते होते. त्यांना आमदार, उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्त्वाची पद दिली. सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का, सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते. निवडणूक हरून देखील राहिले असते. तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकुटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी दिला.