...नांगी धरूनी त्यांची ठेचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 02:25 AM2019-08-04T02:25:23+5:302019-08-04T02:25:42+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी विरोधी पक्षातील नेतेमंडळींची जणू चढाओढच चालल्याचे पाहायला मिळत आहे.

... their stumbling block! | ...नांगी धरूनी त्यांची ठेचा!

...नांगी धरूनी त्यांची ठेचा!

googlenewsNext

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी विरोधी पक्षातील नेतेमंडळींची जणू चढाओढच चालल्याचे पाहायला मिळत आहे. ही ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती मºहाटी मुलुखाला नवी नसली, तरी वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी सध्या विरोधी पक्षांतील नेत्यांची जी रीघ लागली आहे आणि त्यांना पावन करून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांना जी घाई झाली आहे, ती जनतेला आवडलेली नाही किंवा मान्य नाही, असे वाचकांच्या पत्रांवरून स्पष्ट होते. नेतेमंडळींच्या या ‘बेडूकउड्या’ लोकशाहीला मारक आहेत. त्यांच्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याचय होतो. ज्या जनतेने निवडून दिले, त्यांचा विश्वासघात करणे म्हणजे देशद्रोहच! अशांना जनताच मतपेटीतून लगाम घालेल, असा विश्वासही वाचकांना वाटतो आहे.

पक्षांतर बंदीला जनतेने मतपेटीतूनच उत्तर द्यावे
‘आयाराम-गयाराम’ प्रवृत्तीला आळा बसवायचा असेल, तर जनतेने अशा दलबदलू नेतेमंडळींना मतपेटीतून उत्तर देऊन त्यांची जागा दाखवून द्यायला हवी, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. सत्तेत असल्यानंतरच कामे होतात, असे सांगत सध्या अनेक आमदार किंवा आमदार होऊ इच्छिणारे नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. १९६७ मध्ये कॉँग्रेस सत्तेत असताना अशाच प्रकारची पक्षांतराची लाट आली होती. सत्ताधाऱ्यांसोबत जायला लोकप्रतिनिधी इच्छुक असतात. लोकप्रतिनिधींची पक्षांतर प्रवृत्ती बरोबर नाही. पक्षांतर करण्यामुळे लोकशाही केवळ धोक्यात येत नाही, तर कमकुवत होते. मतदारसंघातील विकास आणि जनतेची कामे करायची असतील, तर आपण ती चळवळ, आंदोलने, मोर्चाच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. लोकशाहीमध्ये जनतेचा रेटा हाच सर्वश्रेष्ठ असतो, यावर प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे. सत्ताधारी हे अडवणूक करण्याचा प्रयत्न करतातच, पण म्हणून लगेच पक्षप्रवेश करावयाचा असतो का?
सत्तास्पर्धा आणि गैरमार्गाचा वापर करून विरोधी पक्षात राहता येत नाही. कामे करण्यासाठी सत्तेतच असावे लागते, असे काही नसते. विरोधी पक्षात राहून, विधिमंडळातील अस्त्रे वापरून जनशक्तीच्या बळावर जनतेची कामे करता येतात. मी १९६२ पासून शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवीत आहे. पूर्वी निवडणुकीचा खर्च खूप कमी असायचा. पहिली निवडणूक केवळ अडीच हजार रुपयांमध्ये लढलो. केवळ दोन वाहने आमच्याकडे होती, परंतु विश्वासाच्या जोरावर मी निवडून आलो. तिसºया पिढीने मला मतदान केले. पक्षापेक्षा गणपतराव आहेत, हा विश्वास त्यांच्या दृष्टीने मोठा आहे. मलाही अनेक आमिषे दाखविण्यात आली, परंतु मी माझी निष्ठा कधी ढळू दिली नाही. विरोधी पक्षात राहून चांगली कामे करता येतात, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत मला कधी पक्ष सोडावा, असे वाटले नाही. त्यामुळेच किंबहुना लोकांचा माझ्यावरील विश्वास अधिक दृढ राहिला.
गणपतराव देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे ४५ वर्षे आमदार

निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय नको व्हायला
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असून, दररोज या ना त्या पक्षाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र, पक्षाला मोठे करण्यासाठी ज्यांनी निष्ठेने अविरतपणे काम केले, त्यांना डावलले जाऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, असे वाटते.
भारतीय जनता पक्षाची केंद्रात आणि महाराष्टÑासह इतर अनेक राज्यांत सत्ता आहे. दोन खासदारांपासून सुरू झालेल्या या पक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे. इतर पक्षांपेक्षा भाजपला अधिक जनाधार मिळत आहे, त्यामुळे साहजिकच या पक्षात येणाºया इच्छुकांची भाऊगर्दी वाढते आहे. मात्र, एके काळी अस्तित्वासाठी धडपडणाºया भाजपला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागला आहे. खरं तर या पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून कोणतीही अपेक्षा न बाळगता, समर्पित भावनेने सेवा देणाºया कार्यकर्त्यांच्या भरवशावरच पक्षाची वाटचाल इथपर्यंत झाली आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचा मान ठेवला गेलाच पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी कुणी पक्षात येऊ पाहत असेल. मात्र, आधी तिरस्कृत असलेली या पक्षाची विचारधारा जशी जनतेला पटत आहे, तशी इतर पक्षांच्या नेत्यांनाही पटली असेल आणि या विचारांसोबत काम करून देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाºयांचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोण कोणत्या कारणाने येऊ पाहतोय, यावर आपण भाष्य करणे योग्य नाही, पण चांगले असतील तर घ्यायला हरकत नाही. देशाप्रती व पक्षाप्रती प्रामाणिक भावना आहेत की नाही, या गोष्टी पारखूनच त्यांना प्रवेश द्यायला हवा. शेवटी ऐन वेळी कुणाला प्रवेश देऊन तिकीट द्यायचे, हा निर्णय पक्षाचा आहे. मात्र, निष्ठावान कार्यकर्त्यांचा अवमान होणार नाही, याची काळजी करावी, असे वाटते.
जगदीश सुकळीकर, जनसंघापासून कार्यरत ज्येष्ठ समाजसेवक, नागपूर

घरची करे देवा देवा; बाहेरचीले चोळी शिवा
पूर्वी उभी हयात पक्षात घालविणारे पक्षनिष्ठ लोक होते. काही झालं कोणत्याही विपरित परिस्थितीत आपला पक्ष सोडायचा नाही. पक्षाला संजीवनी देण्यासाठी ते कंबर कसत होते. पक्ष बदलवणे म्हणजे नवरा बदलण्यासारखे समजायचे, पण आजची संस्कृती म्हणजे ‘जिधर दम उधर हम.’ सत्तेची लाट कुणीकडे आहे, हा कल पाहून फक्त आपली खुर्ची वाचवायची, पक्ष जाऊद्या खड्ड्यात, असे आजच्या खुर्चीप्रेमी राजकारण्यांचे धोरण आहे, पण त्यामुळे पक्षाला वैभवाचे दिवस येण्यासाठी ज्यांनी आपली उभी हयात खर्ची घातली, त्यांच्यावर मात्र अन्याय होणार आहे. विरोधी पक्षातून येणाºया आमदाराला येण्याचं बक्षीस म्हणून तिकीट दिले जाते. याला झाडीपट्टीत म्हणतात, ‘घरची करे देवा देवा, बाहेरचीले चोळी शिवा’. आयारामांमुळे सगळ्यात जास्त गोची होते ती कार्यकर्त्यांची. आतापर्यंत शिव्यांची लाखोली वाहणाºया नेत्यासोबत त्यांना तिकडे जावे लागते. कोणत्याही पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना तिकीट देऊ नये. असं झालं, तर लोक म्हणतील की, ‘राब्याले इस न् बीन राब्याले तीस’.
- डॉ. सविता बेदरकर, नेहरू वार्ड सिव्हिल लाइन, गोंदिया.

‘मोले घातले रडाया, न असू न माया’
‘मोले घातले रडाया न असू न माया’ असे हे आयाराम-गयाराम आहेत. त्यांना कोणत्या एका पक्षाशी काही देणे-घेणे नसते. आपल्याला कशी खुर्ची मिळेल ? आपण, आपले नातेवाईक कसे सुखी राहतील, हीच यांची लालसा असते. ज्यांनी भिंतींना रंग देत, रस्त्यांवर रांगोळी काढत, भिंतीवर पोस्टर चिकटवत पक्ष वाढविला, त्या निष्ठावंतांवर या आयाराम-गयारामांमुळे अन्यायच होणार आहे आणि होत राहील. ‘असतील शिते तर जमतील भुते’ ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडते. एखाद्या प्रमुख माणसाकडून फायदा होणार असला की, त्याच्याभोवती भरपूर माणसे गोळा होतात. पुढे काय होईल? याचा कोणीही विचार करत नाही. सत्ताधाºयांनीच या ‘कंत्राटी’ लोकांना आपली जागा दाखवली पाहिजे. भविष्यात दुसरा पक्ष सत्तेवर आल्यास ही ‘कंत्राटी’ मंडळी त्या पक्षातही जाण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाहीत. मांजराला वाटते, आपण डोळे झाकून दूध प्यायले, तर आपल्याला कोणी पाहणार नाही; पण तसे नसते. आयाराम-गयाराम या संस्कृतीला जनताच लगाम घालणार आहे.
- यशवंत परांडकर, ‘साईकृपा’ कैलासनगर, नांदेड.


निवडणूक बंदी करा
महाराष्ट्रातील राजकारणाला सध्या पक्षांतर व फोडाफोडीच्या प्रकारांचे चांगलेच ग्रहण लागले आहे. निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींना व संभाव्य उमेदवारांना राजकीय पक्षांत मेगा भरतीद्वारे प्रवेश देण्यात येत आहे. वास्तविक, यातील किती जणांना तिकिटे मिळतील, हे गुलदस्त्यात आहे. पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना भविष्यातील कमीतकमी १० वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घातली पाहिजे. भारतातील निवडणुकीच्या कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून, लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय निवडणूक लढविता येणार नाही, अशीही तरतूद करण्याची गरज आहे.
- बाळासाहेब भेगडे, तळेगाव दाभाडे - पुणे.

हे नेते मतदारांशी प्रामाणिक राहतील?
आयाराम-गयाराम संस्कृतीला फक्त मतदारच लगाम घालू शकतो. सध्या नेतेमंडळी फक्त आणि फक्त स्वत:चा राजकीय स्वार्थ साधत आहेत. कोणाला भीती आहे, ती आपला भ्रष्टाचार उघड होण्याची, तर कोणी होतोय सत्तेसाठी लाचार. आता वेळ आहे मतदारांनी अशांना घरचा रस्ता दाखवायची. कारण जो माणूस पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाही, तो मतदारांशी काय प्रामाणिक राहणार.
- महेंद्र चंद्रकांत महापूरकर, सावरगांव, ता. माजलगाव, जि. बीड.

नैतिकता गमावली
राजकारण्यांनी नैतिकता गमवल्याचा पुरावा म्हणजे आयाराम-गयारामांची भाऊगर्दी होय. सध्या महाराष्ट्रात या आयाराम-गयारामांनी धुमाकूळ घातला आहे. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून सध्याचे सत्ताधारी हे विरोधकांना आपल्या बाजूने खेचत आहेत, तर काही संधीसाधू सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, त्यामुळे स्वार्थासाठी पक्षांतर करत आहेत. या सर्वांना जनताच घरी बसवेल, हे निश्चित.
- मेघा उज्वलकुमार म्हस्के, भावसिंग पुरा, औरंगाबाद.

शहाणे होऊन मतदान करा
कालपर्यंत प्रस्थापितांच्या नावाने कंठशोष करणारी नेतेमंडळी एका रात्रीतच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. जे लोक स्वत:शी, स्वत:च्या पक्षाशी, प्रामाणिक नाहीत, त्यांच्याकडून जनतेने कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात? जो खुद का ना हुआ, वो हमारा भी नहीं हो सकता! हे नीट लक्षात घेऊन जनतेने लक्ष देऊन मतदान करावं.
- हर्षदा डोंगरे,
मूर्तिजापूर, जि. अकोला.

पक्षबदलू जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाहीत
जे लोक राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी स्वार्थासाठी पक्ष बदलतात, त्यांची निष्ठा जनतेशी अथवा देशाशी नसते. अशांच्या हातून जनतेचे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
- गौरव शिवाजी खेडकर, सिन्नर फाटा, नाशिक रोड.

आयारामांना ५ वर्षांनंतरच
सत्तेत स्थान द्या
सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी सत्ताधारी गटात जाण्यासाठी नेतेमंडळींचा खटाटोप चाललेला असतो. त्यामुळे जो कार्यकर्ता पक्षाचे एकनिष्ठपणे काम करत असतो, त्याच्या कामाला आयारामांमुळे महत्त्व राहत नाही. पक्षानेच अशा प्रवृत्तीला चाप लावला पाहिजे. नवीन येणाºया नेत्याला कमीतकमी ५ वर्षे पूर्ण झाल्यावरच पक्षाने सत्तेत स्थान द्यावे. असे झाले, तरच सर्वसामान्य कार्यकर्त्याला खरा राजकारणाचा आनंद मिळेल.
- आब्राहाम आढाव,
माळवाडी नेक्स्ट, सत्यम सेरेनिटी, वडगाव शेरी-पुणे.

...हे होतच असतं
स्वार्थ आला की, ही अशा आयाराम-गयारामची संस्कृती उदयाला येत असते. पक्षांतर करणारा विचार करूनच दुसºया पक्षात जात असतो. एक तर आपण आहोत, या पक्षाचे भवितव्य धोक्यात आहे, असं त्यांना वाटतं दुसरं म्हणजे सत्ता असेल, तरच आपण जनतेचा विकास करू शकू, असं काहींना वाटत असतं. आयारामांना तिकीट दिले जात असल्याने, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. याला कुणीही लगाम घालू शकत नाही.
- संजय मारोतराव मुसळे, छत्रपतीनगर, हिंगोली.

गुळाभोवती मुंग्या
‘गुळाभोवती मुंग्या’ याप्रमाणे नेतेमंडळी सत्तेभवती लोटांगण घालत आहेत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी एक झेंडा टाकून दुसरा झेंडा हाती घेत आहेत. जनाधार सदैव विकास कामाच्या पाठिशी राहतो, हे बहुदा नेतेमंडळी विसरत आहेत. कालपर्यंत आपला नेता ज्याच्या नावाने बोंबलत होता, आज तोच त्याचे गीत गाताना पाहून सामान्य कार्यकर्ता हतबल झाला आहे. आयाराम-गयारामांचा हा घोडेबाजार लोकशाहीला मारक आहे.
- अ‍ॅड. दिनेश दहे, मानवत, ता.मानवत जि.परभणी.

लोकशाहीचा विश्वासघात
आयाराम-गयाराम संस्कृती ही जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा विश्वासघात आहे. स्वत:पेक्षासुद्धा पक्ष आणि पक्षातील नेत्यांना जिवापाड जपणाºया कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या एकनिष्ठेची ही क्रूर चेष्टाच आहे. मा. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे स्वत:पेक्षा जनता महान म्हणणारे (लोकनेते) आणि लोकशाहीचा विश्वासघात आणि लोकांची दिशाभूल करून तयार झालेले (सुखनेते) या दोन्हीतील अंतर जनताच कमी करणार.
- तानाजी सयाजी म्हेत्रे (सहशिक्षक),
तीर्थ बु., ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद.

 


भाजपने सत्तेसाठी काहीही करू नये
महाराष्ट्रातील भाजप पक्ष हा आयारामांचा पक्ष म्हटले, तरी आजच्या घडीला वावगे ठरणार नाही. कारण २०१४च्या निवडणुकीतील अनेक आमदार हे आयारामच होते. मूळ भाजपचे कमीच आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करून आलेले फार काळ टिकत नाहीत, याचा विचार भाजपने करणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे निष्टेने काम केलेले अनेक नेते व कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. खरंच जे फळाची अपेक्षा न करता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करायला तयार आहेत अशाच नेत्यांना घ्या. गंभीर आरोप झालेल्या नेत्यांना घेऊन तुम्ही काहीच साध्य करू शकणार नाही. सत्तेसाठी काहीही हे ब्रीद वाक्य न करता, आजपर्यंत जी पक्षाने आपली प्रतिमा जपली आहे, ती जपणे खूप गरजेचे आहे. नाहीतर निष्ठावान नेते व कार्यकर्ते गमवून बसाल.
-श्रीविद्या सदाशिव सरवणकर, मु. पो.- वानिवडे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग.

...देशद्रोही लेकाचे!
पद, सत्ता, मोह, अधिकार घराणेशाहीचा वारसा असे लोकशाहीला खिळखिळे करून टाकणारे प्रकार फक्त आपल्या देशातील लोकशाहीतच घडतात. अहो अमेरिकेचे माजी राष्टराध्यक्ष असूनही बराक ओबामा यांना अगदी सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगायला लावणारी अमेरिकेची ती निकोप लोकशाही कुठे आणि पुत्रासाठी पक्षांतर करून स्वार्थी राजकारण करणारी आपली ही घाणेरडी लोकशाही कुठे. प्रचंड चीड येतेय, आपल्या लोकशाहीची, पक्षांतर करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून फासावर चढविले पाहिजे.
- शीतल गुरुनाथ कोरे, हेर. ता.उदगीर, जि. लातूर.

लोकशाहीवरचा विश्वास उडेल
आयाराम-गयाराम ही संस्कृती केवळ सत्तेसाठी चिकटून राहण्यासाठीच उदयास आली आहे. अशा वेळी एखाद्या पक्षात प्रवेश देताना बुद्धिमत्ता, सामाजिक नेतृत्त्वगुण चारित्र्य याची पडताळणी केली, तरच या संस्कृतीला थोड्या-फार प्रमाणात आळा बसेल. अशा तकलादू लोकांमुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते.
-अनिता फडतरे, आंबेगाव खुर्द, पुणे.

जनतेला मूर्ख समजू नका
विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या, तसे राष्टÑवादी व काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे करताना आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी विरोधी विचाराला अंगावर घेऊन पक्ष वाढविला, त्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा घोर अपमान आहे. शिवाय ज्या भाजपमध्ये भरती चालू आहे, त्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवरही घोर अन्यायच आहे. विरोधी पक्षात असताना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता, त्यांनाच मागच्या दाराने स्वत:च्या पक्षात प्रवेश द्यायचा, म्हणजे जनतेला मूर्खात काढल्यासारखेच आहे.
- उमाकांत धांडे, अध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस, गोपालनगर, चंद्रपूर.

संधीसाधूंपासून लोकशाही वाचवा
जेव्हा लोकशाहीचा राजा लोकशाही काय आहे हे विसरतो, तेव्हा आयाराम-गयारामची संख्या जास्तच वाढते. लोकशाही ही झुंडशाहीत रूपांतर होऊ पाहते आहे. आपण निवडून दिलेला व्यक्ती कसा आहे किंवा आपण जे निवडून देणार आहोत तो कसा आहे, त्यांचा इतिहास कोणी पाहत नाही. आता राजकारणात शहाणपणा, हुशारी, अभ्यासू वृत्ती याचं काहीही देण-घेणं ना जनतेला, ना पुढाºयांना आहे. साक्षरता वाढली, पण लोकशाहीची जाणीव लोप पावत चालली आहे. दलबदलू आमदार, खासदार, मंत्र्यांपासून ग्रामीण भागातील प्रतिनिधींना कोणत्याच प्रकारच्या सवलती मिळू नये, यासाठी सर्व भारतीय जनतेने उठाव करावा.
- राठोड एम. आर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड.

नीतिमत्ता कुठे शोधायची?
कालपर्यंत एकमेकांवर गंभीर आरोप करणारे अन् दोन भिन्न विचाराशी बांधिलकी असणारे नेते एका पक्षात येतात म्हणजे विचार वगैरे बासनात गुंडाळून ठेवलेत, असेच म्हणावे लागेल. एखादा राजकीय पक्ष अडचणीत असेल, तर लगेच सोयीच्या आणि फायद्याच्या पक्षात उडी मारणे याला राजकारण म्हणत असले, तरी लोक यांना संधीसाधूच म्हणतात. अशा नेत्यांना एक तर निष्ठा नसतेच. ते फक्त सोय आणि फायदा पाहतात. अशांना ज्या पक्षाने प्रवेश दिला आहे, त्यांनीही विचाराशी आणि तत्त्वाशी तडजोड केली असेल, तर नीतिमत्ता शोधायची कुठे? असा प्रश्न पडतो.
- ईश्वर अर्जुन ठाकरे,
जिल्हाध्यक्ष, बळीराजा पार्टी, चंद्रपूर.

लोकशाही वाचवा
लोकशाहीमध्ये सत्तारूढ असो वा विरोधी पक्ष, सर्व सदस्यांना तर जनतेनेच निवडून दिलेले असते. विरोधी पक्षातले सदस्यही सत्तारूढ पक्षाला सामील झाले, तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे लोकांनी दिलेल्या मताला काहीच किंमत राहत नाही. त्यांना देश, जनता, लोकशाही याच्याशी काही देणे-घेणे नाही, असाच त्याचा अर्थ होतो. अशा लोकांपासून मताद्वारेच लोकशाही वाचवायला हवी.
- भागवत अंबुले, नागपूर.

सूज्ञ मतदारच याला अंकुश लावतील
अगदी दोन महिन्यांपूर्वी एकामेकांवर खालच्या थरावर जाऊन चिखलफेक करणारे राजकीय लोक अचानक एकमेकांच्या गळ्यात गळे घालू लागल्याने जनतेला कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न पडला आहे. कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. नेत्यांच्या प्रेमापोटी त्यांनाही तत्त्वांना मुरड घालावी लागत आहे. सूज्ञ मतदारच आयाराम गयारामांना धडा शिकवतील, असे वाटते.
- कन्हैय्या नरसव्वा नलगोंडा,
डॉ. विनायक गोरे पथ, चितळसर, मानपाडा, ठाणे

मतदारांचा अपेक्षाभंगच
पाच वर्षे पक्षांतर करता येणार नाही, तसेच पक्षात आल्यानंतर किमान पाच वर्षे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाºयांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशा काही अटी घातल्या, तर आयाराम-गयाराम संस्कृतीला आळा बसेल. ही अशी दलबदलू नेतेमंडळी मतदारांशी एकप्रकारे प्रतारणाच करीत असतात.
-भा. ल. भावसार, हिंगोली.

राजकीय पक्षांनी तत्त्वे पाळावीत
पक्षांतर करणे, आयाराम-गयारामांना जवळ करणे, आमदार फोडणे या गोष्टी फुकटात होणाºया नाहीत. यासाठी प्रचंड धनशक्ती खर्च होते. हा पैसा वसूल करण्यासाठी पुन्हा अवैध मार्गाचाच अवलंब करावा लागतो. हे जनतेला कळते. राजकीय पक्षानी सोयीने न वागता तत्त्वे पाळली, तर आयाराम गयाराम सोकावणार नाहीत.
- रमेश वडणगेकर, कोल्हापूर.


वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याची प्रवृत्ती
आयाराम-गयाराम पद्धतीचे लोक वाहत्या गंगेत हात धुऊन घेणाऱ्या प्रवृत्तीचे असतात. कोणताही राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्य योग्य पद्धतीने चालत नाही. राष्ट्रहितासाठी सामान्यातल्या सामान्य माणसालासुद्धा पुढे येऊन चांगल्या विचाराचे योग्य संघटन करून पक्ष आणि पक्षसंघटनाची नीती लोकांना स्पष्ट सांगून आणि सत्यात उतरवून खरोखरच राष्ट्राला पुढे नेण्याची जिद्द हवी. इथे तर सर्वच स्वार्थी मग नाव कुणाला ठेवायचे आणि चांगले कुणाला म्हणायचे?
- अरुणा उटीकर, जैनगिरी जतवाडा.

मेगाभरती....
महाराष्ट्राच्या भूकंपात हादरली धरती
मेगा भरती सुसाट!
स्वार्थासाठी सकलांनी
ठोकरली पक्षनिष्ठा
खुर्चीची प्रतिष्ठा जपावया!
नव प्रवेशित ठरले भाग्यवंत
जुने निष्ठावंत वाºयावर!
हाडवैरी कालचे आज झाले मित्र
कार्यकर्ते मात्र सैरभैर!
सांगा इथे कोणता पक्ष आहे सुखी ?
आतुन 'ज्वालामुखी' खदखद!
- दादाराव नामदेवराव अवचार,
मालेगांव, जि. वाशीम

मतदारही विचार करतीलच
केवळ पक्षाला पाहून मत देणाऱ्यांचा कल कमी आहे. त्यामुळे कोलांट उड्या मारल्या, तरी निवडणुकीला सामोरे जाताना त्यांची दमछाक होणार आहे. कोणी पक्षांतर केले आणि का केले हे जनता चांगली ओळखते. त्यामुळे अशांसाठी राजकारण सोपे नाही. मतदार बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवतील.
-यश भास्करराव माकोडे, महादेवनगर, अमरावती.

पुन्हा निवडून आल्याशिवाय पद देऊ नये
सध्या सत्तारूढ भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. ज्या पक्षाने आपल्याला भरभरून दिले, त्या पक्षाशी काडीमोड घेऊन सत्तारूढ पक्षात जाताना नेत्यांना कसलेही सोयरसुतक वाटत नाही. नवीन पक्षात जाताना जुन्या पक्षाची तत्त्वे, विचारधारा याच्याशी आपले काहीही देणेघेणे नाही, असे जणू ते वागत असतात. खरं म्हणजे हा एक प्रकारे जनतेशीही केलेला विश्वासघात आहे. पक्षबदल केलेल्या व्यक्तीला पुन्हा जनतेमधून निवडून आल्याशिवाय कोणतेही पद अथवा मंत्रीपद मिळणार नाही, अशी कायद्यात तरतूद करावी. तसेच जनतेने त्यांना बरोबर धडा शिकवावा.
- डॉ. गिरीश वि. वैद्य, आय. टी. आय. कॉलेज जवळ, म्हाडा कॉलनी, वर्धा.

...तर निष्ठावंतावर अन्याय होणारच
आयारामांमुळे ज्याने आयुष्यभर पक्ष वाढीसाठी खस्ता खाल्ल्या, त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतोच. खरे तर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र व शत्रू नसतो, परंतु सध्याच्या राजकारणाची परिभाषा बदलली असून, केलेल्या गैरव्यवहाराला संरक्षण मिळविण्यासाठी काही मंडळी पक्षांतर करताना दिसतात. कार्यकर्ते नेत्यासाठी जिवाची बाजू लावून विरोधी पक्षासोबत लढत असतात, परंतु नेतेच जर त्या पक्षाच्या वळचणीला गेले तर त्या बिचाºया कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची होळी होते. त्यांनी काय करायचे? त्यामुळे आयाराम-गयाराम संस्कृती सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी नक्कीच घातक ठरणारी आहे हे मात्र नक्की.
-प्रमोद दिलीप बिनवडे, ब्रह्मपुरी, ता.मंगळवेढा जि. सोलापूर.

Web Title: ... their stumbling block!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा