गॅसटंचाईच्या काळात ‘शिवम चूल’चा आधार;
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:27 IST2026-03-15T11:27:33+5:302026-03-15T11:27:33+5:30
पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि स्वयंपूर्ण असा हा प्रयोग आता प्रेरणादायी ठरत आहे...

गॅसटंचाईच्या काळात ‘शिवम चूल’चा आधार;
परभणी : गॅसटंचाईच्या काळात धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये एक वेगळीच व्यवस्था अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. येथे गॅसशिवाय शेतीतील काडीकचऱ्यावर ‘शिवम चूल’च्या माध्यमातून दररोज तीन हजार विद्यार्थ्यांचा स्वयंपाक केला जातो. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि स्वयंपूर्ण असा हा प्रयोग आता प्रेरणादायी ठरत आहे.
येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये आधुनिक पद्धतीचे सेंट्रल किचन उभारण्यात आले आहे. या किचनमध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळेस हजारो विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केले जाते. विशेष म्हणजे हा संपूर्ण स्वयंपाक गॅस किंवा लाकडाशिवाय केला जातो, शेतकऱ्यांच्या शेतात उरलेला सोयाबीन भुसा, तुरीचा भुसा, सोयाबीनचे काड, कापसाची पराटी तसेच इतर काडीकचरा याचा या चुलीत इंधन म्हणून वापर केला जातो. या चुलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती निर्धूर आहे.
धुरातून तयार होते गरम पाणी
शिवम चुलीमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा उपयोग करून त्यावर वॉटर हिटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळत आहे.
पर्यावरणपूरक स्वयंपूर्णतेचा संदेश
या चुलीची संकल्पना प्रा. किरण सोनटक्के आणि त्यांचे बालमित्र संपत गवते यांच्या चर्चेतून पुढे आली. २००९ साली या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली. चुलीची रचना योग्य होण्यासाठी तब्बल २७ वेळा प्रयोग करून बदल करण्यात आले.
सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीनंतर अखेर ‘शिवम चूल’ पूर्णक्षमतेने कार्यान्वित झाली. जागतिक संघर्षामुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘शिवम चूल’ हा प्रयोग पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्णतेचा आदर्श ठरत आहे.
केवायसीच्या अफवेने ग्राहकांची मोठी तारांबळ
धरणगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच केवायसीच्या अफवेने ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. शनिवारी येथील इंडियन गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर बुकिंगसाठी ग्राहकांची रांग लागली होती.
गॅस संपला तर स्वयंपाकाचे काय होणार, या चिंतेमुळे नागरिक सकाळी सात वाजल्यापासूनच रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. दरम्यान, ऑनलाइन बुकिंगमध्ये तांत्रिक अडथळे येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत.
राज्यात गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा
राज्यात घरगुती एलपीजी गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा आहे.राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी ९ हजार मेट्रिक टन असताना उत्पादन वाढवून ते ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलिंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे.
छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री