फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:20 IST2025-11-19T18:17:51+5:302025-11-19T18:20:12+5:30
Eknath Shinde Amit Shah Mahayuti: महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतच नेत्यांच्या फोडाफोडीवरून राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांची बैठक झाली. पण, आता शिंदे थेट दिल्लीत पोहोचले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत.

फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
Eknath Shinde Latest News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि महायुतीतच झुंजी सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेलाच हादरे दिले जात असल्याच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावरही हे सगळे टाकले. पण, अद्यापही शिवसेनेच्या मनासारखा तोडगा निघाला नसल्याची स्थिती दिसत आहेत. कारण अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्ली गाठली. उपमुख्यमंत्री शिंदे अमित शाहांची भेट घेणार असून, त्यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबद्दल चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजप आणि शिवसेनेतच एकमेकांचे नेते फोडण्याच्या स्पर्धा लागल्यानंतर भाजपने शिंदेंचा मैदान असलेल्या ठाण्यातच जोरदार हादरे दिले. इतर जिल्ह्यातही भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री, नेते यांच्या राजकीय विरोधकांनाच पक्षात घेतले आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली खदखद बाहेर आली. मंगळवारी शिंदेंचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी तोडगा निघाल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा
मंगळवारी घडलेल्या राजकीय नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी अचानक दिल्लीत दाखल झाले. शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, त्यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतीलच तीन पक्षात सुरु असलेल्या कुरघोड्यांचा मुद्दा यावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली होती. पण, भाजपने मुंबई आणि इतर एक-दोन महापालिका वगळता राज्यभरात स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तेव्हापासून भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यात ठाणे जिल्ह्यातील फोडाफोडी जास्त चर्चेत आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी भाजपने अशा काही नेत्यांना पक्षात घेतले आहे, ज्यांना शिवसेनेचा विरोध आहे. शिवसेनेच्या नेत्यांचे राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांनाच भाजपने पक्षात घेऊन बळ दिले आहे. अलिकडेच नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अद्वय हिरे यांना पक्षात घेऊन भाजपने दादा भुसे यांना धक्का दिला आहे. अद्वय हिरे आणि दादा भुसे यांच्यात राजकीय वैर आहे. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या राजू शिंदे यांना पक्षात घेतले आहे.