Pushpak express accident news: मुंबईच्या दिशेने येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्याने दुसऱ्या एक्स्प्रेस खाली येऊन तब्बल ७ ते ७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, रेल्वेच्या अधिकाऱ्यानी या अपघाताबद्दल माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या पुष्पक एक्स्प्रेस गाडीतून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या गाडीखाली येऊन जवळपास ७ ते ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान बुधवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान घडली. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चेन खेचल्यामुळे घडली घटना
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी या घटनेची माहिती दिली. "पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने येत होती. एक्स्प्रेस पाचोरा ते परधाडे दरम्यान असतानाच कुणीतरी ACP अलार्म म्हणजे चेन खेचली. त्यामुळे अचानक ब्रेक लागला. चेन का खेचण्यात आली, याची माहिती रेल्वेकडे अद्याप आलेली नाही."
"पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवासी दुसऱ्या रेल्वे रुळावर आले आणि त्याचवेळी तिथून कर्नाटक एक्स्प्रेस गेल्याने अपघात घडला. अधिकारी सध्या घटनास्थळी पोहचत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ८ रुग्णावाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत", अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली.
८ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
"रेल्वेच्या गाड्या आणि रेल्वेच्या रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदतीचे प्रयत्न सुरू आहेत", असेही गेडाम यांनी सांगितले.