"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 20:50 IST2025-10-02T20:49:04+5:302025-10-02T20:50:01+5:30
Uddhav Thackeray at Dasara Melava IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून मोदी-शाह जोडीला सुनावलं

"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
Uddhav Thackeray at Dasara Melava IND vs PAK Asia Cup 2025 : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत फूट पडल्यापासून दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे होऊ लागले. त्यातील दादरच्या शिवाजी पार्क येथील मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. बहुप्रतिक्षित दसरा मेळाव्यात आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपावर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून गृहमंत्री अमित शाह आणि ICC प्रमुख जय शाह यांच्यावर टीकेची तोफ डागली. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्यावरही बोचरी टीका केली.
पंतप्रधान मोदींवर टीका
"एकीकडे बटेंगे तो कटेंगे चा नारा द्यायचा आणि दुसरीकडे मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घेण्याबाबत सांगायचे.. हे पंतप्रधान मोदींचे नेमके काय चालले आहे? तुम्ही नक्की हिंदू तरी आहात का, हे तपासून घ्या. आशिया कप जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि तेसुद्धा पाकिस्तानबरोबर खेळायचे होते, तर मग तुम्ही कशाला 'ऑपरेशन सिंदूर'चे ढोंग केले," असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला.
अमित शाह-जय शाह यांना सुनावलं
ते पुढे म्हणाले, "तुम्हीच आम्हाला सांगितलेत की पहलगाममध्ये धर्म पाहून, हिंदू आहात का विचारून गोळ्या घालण्यात आल्या. धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या देशासोबत तुम्ही क्रिकेट खेळता याचा अर्थ 'बाप देशप्रेमाचे नाटक करतो आणि मुलगा क्रिकेट खेळतो' हीच तुमची घराणेशाही. ही तुमची नासलेली, कुजलेली घराणेशाही आहे. दुसरीकडे आमच्या ठाकरेंच्या घराण्याला एक परंपरा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे," असेही ठाकरेंनी ठणकावले.
भाजपा म्हणजे अमीबा...
"भाजपा म्हणजे आता अमिबा झाला आहे. तो एक पेशी प्राणी असतो. तो वाटेल तसा वेडावाकडा कसाही पसरतो. त्याप्रमाणेच भाजपदेखील मिळेल तिकडे युती करत सुटली आहे. त्यांचे लोक शक्य तिकडे आपला विस्तार करत आहेत, पण एकपेशी आहेत. म्हणजेच इतर कोणालाही शिल्लक ठेवायचे नाही, फक्त मीच शिल्लक राहणार असा त्यांच्या अजेंडा आहे. तसेच अमिबा शरीरात गेल्यास पोट बिघडते, त्याप्रमाणे हे लोक समाजात घुसल्याने समाजातील शांती नाहीशी होत आहे. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो," अशी टीका उद्धव यांनी भाजपावर केली.