“सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर वरळीची जनता नाराज,” मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 09:00 IST2023-04-07T08:59:46+5:302023-04-07T09:00:22+5:30
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचं सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं होतं.

“सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर वरळीची जनता नाराज,” मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यापूर्वी या बालेकिल्याला मानत होते. परंतु आता ते मानत नाही. त्यामुळे याच ठाण्यात या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचं सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर यावरून मनसेनं त्यांना जोरदार टोला लगावला आहे.
ठाण्यात लढायला तयार, आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच बालेकिल्यात दिले आव्हान
“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे. आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना डिवचलं.
वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे.आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना ???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 7, 2023
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
तुम्ही मला निवडून द्या मी राज्याला छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कोरोना काळात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन सरकार चालविलं असं बोललं जातं. मात्र त्यांनी केलेल्या कामामुळेच आज त्यांना कुटुंब प्रमुख म्हणतात. अन्यथा आपल्या राज्याची परिस्थिती सूरत, अहमदाबाद सारखी झाली असती असा टोला त्यांनी लगावला. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच पद्धतीनं एकदा फेसबुक लाईव्ह जाण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी देशाचा पंतप्रधानांनाच राष्ट्रपती करुन टाकलं होतं. अशी खिल्लीही त्यांनी उडवली.