"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:33 IST2025-10-31T11:29:01+5:302025-10-31T11:33:02+5:30

Rohit Arya Encounter Case: रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने गुरुवारी मुंबईतील पवई परिसरातील एका स्टुडियोमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रोहित आर्य याचा एन्काऊंटर करत या ओलिसांची सुटका केली होती. मात्र आता पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटरवरून शंका उपस्थित होत आहेत. तसेच आता काँग्रेसनेही या प्रकरणी सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत.

''The path taken by Rohit Arya is wrong, but...'' Congress raises serious questions | "रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न

"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न

सरकारने आपण केलेल्या कामाचे कोट्यवधी थकवल्याचा आरोप करत रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने गुरुवारी मुंबईतील पवई परिसरातील एका स्टुडियोमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रोहित आर्य याचा एन्काऊंटर करत या ओलिसांची सुटका केली होती. मात्र आता पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटरवरून शंका उपस्थित होत आहेत. तसेच आता काँग्रेसनेही या प्रकरणी सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ते म्हणाले की, रोहित आर्य याने जो मार्ग पत्करला तो गुन्हेगारी स्वरूपाचा होता, यात शंका नाही. पण त्या मार्गावर जाण्यासाठी त्याला प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे, त्या स्थितीपर्यंत नेणारे हे महायुतीचे शासनच आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

ते पुढे लिहितात की, राज्यात असे अनेक कंत्राटदार आहेत ज्यांची बिले अद्याप थकलेली आहेत. जवळपास  ८९,००० कोटी रुपयांची देयके शासनाकडून प्रलंबित आहेत. या शासनाने राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले, पण भाजपा–शिवसेना नेत्यांच्या तुंबड्या मात्र भरल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग असो, शिक्षण विभाग असो किंवा इतर कोणताही विभाग असो, अनेक कंत्राटदार शासनाच्या दारात खेटे घालत आहेत.अनेकांनी कर्जे घेतली, अनेक जण उध्वस्त झाले. सांगलीत हर्षल पाटील यांचे दीड कोटी रुपये जल जीवन मिशनखाली थकले होते; अखेर त्यांनी आत्महत्या केली. पण शासनाने त्यांच्याविषयी हात झटकले. नागपूरचे कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांनीही नुकतीच आत्महत्या केली, असा आरोप सावंत यांनी केला.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, आता रोहित आर्या याच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याचे ४५ लाख रुपये थकले होते. त्याने अनेक वेळा उपोषणे केले असे समजते, शेवटी पुणे पत्रकार संघासमोर आंदोलन केले. ही प्रेस नोट त्याचीच आहे का? याचा तपास करणे आवश्यक आहे. यामध्ये त्याने स्पष्टपणे नावे घेतली आहेत. यानंतरच त्याने तो गुन्हेगारी मार्ग स्वीकारला. तो मार्ग चुकीचा आहे, यात वाद नाही. पोलिसांनी त्या ओलीस मुलांची सुटका केली त्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन, पण त्याला त्या टोकाला नेणारेही तितकेच दोषी आहेत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

यावेळी सचिन सावंत यांनी एका कथेचंही उदाहरण दिलं. एका कथेमध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावली गेली. तेव्हा त्याने आईला भेटायची विनंती केली आणि मग त्या आईचा कान करकचून चावा घेतला. तसेच “तू मला योग्य वेळी थांबवलं असतंस, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती.” असे तो म्हणाला. मरणाच्या आधी शासनाचे कान त्या आर्याच्या जवळ असले पाहिजे होते, अशी खंतही सावंत यांनी व्यक्त केली. 

Web Title : बंधक संकट के बाद कांग्रेस ने सरकार पर उठाए सवाल, भुगतान में देरी का आरोप।

Web Summary : कांग्रेस ने रोहित आर्य की बंधक स्थिति के बाद सरकार की आलोचना की, बकाया भुगतान का कारण बताया। सचिन सावंत ने सरकार की नीतियों को आर्य को अपराध के लिए मजबूर करने का आरोप लगाया, लंबित ठेकेदार भुगतान और आत्महत्याओं का हवाला दिया।

Web Title : Congress questions government after hostage crisis, blames non-payment.

Web Summary : Congress criticizes government after Rohit Arya's hostage situation due to unpaid dues. Sachin Sawant blames government policies for pushing Arya to crime, citing pending contractor payments and suicides.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.