भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास

By यदू जोशी | Updated: November 12, 2025 11:32 IST2025-11-12T11:32:23+5:302025-11-12T11:32:41+5:30

Maharashtra Local Body Election: भाजपच्या निरीक्षकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जी संभाव्य नावे प्रदेश भाजपकडे पाठविली असतील त्यातीलच एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे संघटनेच्या माध्यमातून आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

The names given by BJP observers will be confirmed, 95 percent of the names of mayors and corporators are final; Trust in the organization | भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास

भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास

- यदु जोशी
मुंबई -  भाजपच्या निरीक्षकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जी संभाव्य नावे प्रदेश भाजपकडे पाठविली असतील त्यातीलच एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे संघटनेच्या माध्यमातून आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि जिल्ह्याच्या प्रभारींची बैठक मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. त्यावेळी खालून आलेल्या नावांपैकीच एकाला संधी देण्याचा निर्णय झाला. जवळपास ९५ टक्के ठिकाणी हाच फॉर्म्युला राहील. पॅनेलमध्ये आलेल्या नावांपैकी एकाचेही नाव पक्ष करत असलेल्या विविध प्रकारच्या सर्वेक्षणांमधून पुढे आले नाही तर अशा ठिकाणी सर्वेक्षणातून पुढे आलेल्या व्यक्तीला संधी दिली जाणार आहे. भाजपने प्रत्येक नगर परिषदेत एकेक निरीक्षक पाठवून पक्षाच्या स्थानिक ६१ पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा करून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे जाणून घेतली होती. नगराध्यक्षपदासाठी दोन-तीन आणि नगरसेवकासाठी दोन-तीन जणांची नावे त्यांनी प्रदेशकडे पाठविली. त्यापैकीच एकाला संधी देऊन पक्षामध्ये संघटनेला किती महत्त्व आहे, हा संदेश दिला जाणार आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या पसंतीनुसार नावे दिली तर संघटना उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील आणि त्याचा फायदा पक्षाला होईल, असा विचार त्यामागे आहे. 

सकाळी झालेल्या बैठकीनंतर सायंकाळी पुन्हा निवडक भाजप नेत्यांची बैठक झाली आणि त्यात विशेषत: नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्याबाबत चर्चा झाली. प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या दोन/तीनपैकी कोणते नाव नक्की करायचे यावर विचारविनियम करण्यात आला. 

बावनकुळे भाजपचे निवडणूक प्रभारी
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा केली.  मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडणुकांत महायुती प्रचंड विजय मिळवेल, असा विश्वास बावनकुळे यांनी बैठकीत  व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी  माझ्यावर अलीकडेच आलेली आहे. त्यामुळे निवडणुकांचा अनुभव असलेले नेतृत्व सोबतीला असणे आवश्यक आहे, म्हणून बावनकुळे हे निवडणूक प्रभारी असतील असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.

महायुती टिकवण्यासाठी मंत्र्यांवर जबाबदारी
शक्यतो महायुतीच व्हायला हवी, अशी भूमिका घेत तीन पक्षांच्या समन्वय समितीने बैठकीत एक रणनीती निश्चित केली.
त्यानुसार स्थानिक पालकमंत्री आणि अन्य दोन पक्षांचे संपर्क मंत्री अशा तिघांची समिती प्रत्येक जिल्ह्यात येत्या दोन-तीन दिवसांत जाऊन महायुतीने एकत्रितपणे लढावे यासाठी प्रयत्न करेल.
सूत्रांनी सांगितले, की समन्वय समितीच्या बैठकीत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी ठाणे-कोकणात भाजपचे स्थानिक नेते शिंदेसेनेवर उघडपणे टीका करीत असल्याबद्दल तीव्र नाराजी 
व्यक्त केली. 

स्वबळावर लढा...
मित्रपक्षांबरोबर जाऊ नका स्वबळावर लढा असा आग्रह काही भागांमधील नेत्यांनी भाजपच्या आजच्या बैठकीत धरला. विशेषत: विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नेते आग्रही होते. मित्र पक्षांचे काही नेते उघडपणे भाजपच्या नेत्यांविरुद्ध बोलत आहेत याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

नंबर वन आपणच पण मित्रांना दुखावू नका : मुख्यमंत्री
आगामी निवडणुकीत नंबर वनचा पक्ष हा भाजपच राहिला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी आपला क्रमांक एकचा विरोधक आहे, हे लक्षात ठेवा. मित्रपक्षांना कुठेही दुखावू नका. स्थानिक पातळीवर कुठे समन्वय होत नसेल तर वरिष्ठ नेत्यांना सांगा, पण मित्रपक्षांच्या नेत्यांवर टीका करण्याचे टाळा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत दिला.

Web Title: The names given by BJP observers will be confirmed, 95 percent of the names of mayors and corporators are final; Trust in the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.