Disha Salian Ambadas Danve News: "सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं. सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात? मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही", असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधान परिषदेत सत्ताधारी आमदारांवर बरसले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा काढत सत्ताधारी आमदारांनी डिवचल्यानंतर दानवेंचा रौद्रवतार बघायला मिळाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंबादास दानवेविधान परिषदेत बोलत होते. त्यावेळी दिशा सालियनचा मुद्दा सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी काढला. त्यावर दानवे म्हणाले, "चर्चा करा. राज्याने एसआयटी नेमलेली आहे. चित्राताईंनी मागणी केलीये. सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं."
मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही -दानवे
गिरीश महाजनांनी दानवे बोलत असताना व्यत्यय आणला. त्यावर दानवे म्हणाले, "गिरीशजी, मला बोलू द्या. मी तुमच्याशी बोलत नाहीये. मी सांगून ठेवतोय. मंत्र्याचा हस्तक्षेप, सभापती महोदय थांबवायला सांगा. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही. मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही. ज्याचं असेल, त्याने करायचं", अशा शब्दात अंबादास दानवेंनी व्यक्त केला.
तुम्ही कोणाकडे मागणी करता आहात?, दानवेंचा सवाल
"माझं बोलणं चालुये. नाहीतर मला थांबवा. मी बाहेर जाऊन बसतो, मंत्र्यालाच बोलू द्या. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालता. मला बोलू द्या नाहीतर मी बाहेर जाऊन बसतो. नेहमीच आहे यांचं. करा ना तुमचे मुख्यमंत्री आहेत. जाऊन करा... तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता... जा ना त्यांच्याकडे. इथे काय बोलता? सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?", असा उलट सवाल अंबादास दानवे दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सत्ताधारी आमदारांना केला.
"वारंवार हे मंत्री प्रत्येकवेळी हस्तक्षेप करतात. त्यांच्याकडे हे खातं आहे का? त्यांना सरकारने जबाबदारी दिलीये का? उगाच प्रत्येक गोष्टीत सामुदायिक जबाबदारी म्हणायचं. आम्ही राज्यपालांकडे जाऊन आलो. आम्ही काही विशिष्ट मंत्र्यांबद्दल बोललो. कारण अशा पद्धतीने मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे", असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
माझ्या तोंडून काही निघून जाईल -दानवे
"यांनी मध्ये बोलायची गरज नाही. त्यांची भूमिका आम्ही ऐकली ना. आमची भूमिकाही ऐका. ऐकायची तयारीच नाहीये. सगळं तुमचंच खरं आहे आणि आमचं खोटं आहे. तुमची (गिरीश महाजन) परवानगी घेऊन बोलत नाहीये मी. तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल. यांनी मध्ये काही बोलायचं नाही", असा इशारा दानवेंनी दिला.
त्यानंतर गोंधळ झाल्याने सभापतींनी विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.